कुडाळ : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान; धामापूर पेठवाडी येथील घटना | पुढारी

कुडाळ : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान; धामापूर पेठवाडी येथील घटना

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : एक सोनेरी कोल्हा मालवण तालुक्यातील धामापूर-पेठवाडी येथे एका खोल विहिरीत पडला. कुडाळ वनविभागाच्या रेस्कू पथकाने सुखरूप बाहेर काढत त्याला जीवदान दिले. ही घटना रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.

रविवारी दुपारी दिनेश काळसेकर यांच्या विहिरीमध्ये कोल्हा पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. काळसेकर यांच्या घरालगत असलेल्या सुशीलकुमार घाडी यांनी ही माहिती दिली. कुडाळ वनपरिक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 15 ते 20 फूट खोल विहिरीत पडलेल्या त्या कोल्ह्यास सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पाण्याची पातळी सुमारे 4 ते 5 फूट असलेल्या या विहिरीत कोल्ह्याने बिळ केल्याने, तो पाण्याबाहेर येताच त्या बिळामध्ये जात असे. त्यामुळे या बचाव कार्यात अडचण येत होती. अखेर अथक प्रयत्नाने त्यास पिंजऱ्यात घेण्यात बचाव पथकास यश आले.

सदर वन्यप्राणी सोनेरी कोल्हा असून, भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आल्याने कठडा नसलेल्या विहिरीत तो पडला असावा. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

प्रभारी उपवनसंरक्षक दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण बचावकार्य पार पडले. कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, वनपाल (मालवण) श्रीकृष्ण परीट, वनरक्षक (धामापूर) शरद कांबळे, वाहनचालक राहुल मयेकर या सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ सुशील घाडी, बाळकृष्ण घाडीगावकर, दिनेश काळसेकर, तेजस वालावलकर, चेतन काळसेकर यांच्या मदतीने हे बचावकार्य यशस्वी केले.

हेही वाचा

Back to top button