सिंधुदुर्ग : गट,गण फेरबदलाबाबत 40 हरकती! | पुढारी

सिंधुदुर्ग : गट,गण फेरबदलाबाबत 40 हरकती!

ओरोस; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेत अनेक गट आणि गणांत मोठ्या प्रमाणात गाव स्तरावर फेरबदल करण्यात आले आहेत. या बदलांच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्हाभरातून 40लेखी तक्रारी, हरकती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर 16रोजी कोकण आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. मतदारसंघांची रचना बदलल्याने सर्वच मतदारसंघांची राजकीय समिकरणे बदलली असून अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. यामुळे काहीना मतदारसंघात पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे .

राज्य निवडणूक आयोगाच्या जि.प., पं. स. मतदारसंघ प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रमानुसार गट व गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. या प्रस्तावांनुसार आयुक्त स्तरावर भौगोलिक व लोकसंख्येच्या आधारे 30 मे रोजी गट व गणना रचनेस मान्यता देण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांंच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी 2 जून रोजी प्रारुप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध केली. या नवीन अधीसूचनेनुसार जिल्हा परिषद गटांची संख्या 50 वरून 55 वर तर पंचायत समिती गणांची 100 वरून 110 वर पोचली आहे. या वाढीव गटांमुळे पूर्वीच्या गट व गणातील काही गावांचा दुसरा गट आणि गणामध्ये समावेश झाला आहे.तसेच काही गट व गणांची नावेही बदलली आहेत. वाढीव गटामध्ये व त्या अंतर्गत झालेल्या गणांमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. त्यामुळे आता वाढीव गट व गण सह सर्व गट व गणांमध्ये राजकीय कालवाकालव सुरू झाले असून अनेक इच्छुक पदाधिकार्‍यांमध्ये ‘कही खुशी तर कही गम’ असे चित्र आहे.

हरकतींवर 16 जून रोजी सुनावणी

जिल्हाधिकार्‍यांनी प्रभाग रचनेवर मागवेलेल्या लेखी हरकती व सूचनांनुसार 8 जुलैपर्यंत जिल्हाभरातून 40 लेखी तक्रार अर्ज जि. प. प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या सर्व तक्रार अर्जावर व हरकतींवर 16 जून रोजी सुनावणी होणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी जाहीर केली जाणार आहे.

राजकारणात येण्यास इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राजकारणात प्रवेश करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती हा एक चांगला मार्ग मानला जातो. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक युवानेत्यांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यानंतर या निवडणूका होणार असल्यामुळे इच्छुकांची प्रचार रंगत गणेशोत्सवापासून सुरू होणार आहे .

आरक्षण सोडतीकडे लक्ष

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जाहीर प्रारुप प्रभाग रचना अपवाद वगळता कायम रहाणार आहेत. यामुळे प्रभाग रचना नंतर आता मतदारसंघ आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष असून आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. महिलांना 50 टक्के जागा राखीव आहेत त्यामुळे पत्नी किंवा नातेवाईक महिलेला निवडणुकीत उतरविण्याची तयारीही अनेक नेत्यांनी केली आहे. शिवाय पक्षाकडून तिकिट न मिळाल्यास अपक्ष की विरोधी पक्षातून लढावे यादृष्टीनेही काही इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आरक्षण सोडतीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Back to top button