सिंधुदुर्गसह ११ जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस | पुढारी

सिंधुदुर्गसह ११ जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 11 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने गुरुवारी दिला आहे. बंगालच्या उपसागरातून आलेल्या बाष्पयुक्त वार्‍यांमुळे मेघालय, कर्नाटक, केरळ, रायलसीमा, अंदमान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांत जोरदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे, तसेच अफगाणिस्तानात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने जम्मू-काश्मीर, हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस बरसू लागला आहे. मात्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या भागांत 20 मेपर्यंत तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मान्सून शनिवारी अरबी समुद्राच्या दक्षिण भागात बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भागापासून वेगाने आगेकूच करीत असलेला मान्सून अनुकूल परिस्थितीमुळे दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मान्सूनच्या प्रगतीसाठी गुरुवारी अनुकूल स्थिती प्राप्त झाल्याने मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातून नैऋत्य मोसमी वार्‍यांनी वेगाने दक्षिण अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 21 मे रोजी (शनिवारी) तो अरबी समुद्राच्या दक्षिण भागात दाखल होईल.

Back to top button