खेड : महागाईने मोडले ग्राहकांचे कंबरडे | पुढारी

खेड : महागाईने मोडले ग्राहकांचे कंबरडे

खेड : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा तोंडावर आल्याने आठवडी बाजारात एकच गर्दी दिसून येत आहे. मात्र, यंदा महागाईच्या उच्चांकामुळे भाज्या, खाद्यतेल व मसाल्याच्या पदार्थांच्या दरात जवळपास दुपटीनेवाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.

पावसाळा तोंडावर आल्याने तसेच सामान्यांचा आधार असलेली लालपरी हळूहळू सुरू झाल्याने आणि कोरोनाचे निर्बंध हटविल्यामुळे आठवडा बाजार गजबजू लागले आहेत. खेड तालुक्यातील सगळ्यात मोठा भरणे येथील आठवडा बाजार देखील ग्राहकांच्या गर्दीने फुलू लागला आहे. सर्वच भाजीपाल्यावर महागाईंचा परिणाम दिसून येत आहे. बाजारात छोट्या कांद्याचा दर किलोमागे 15 ते 20 रुपये आहे. मोठ्या कांद्याचा दर किलोमागे 20 ते 25 रुपये इतका आहे.

त्याप्रमाणे बटाटा 28 ते 35 रुपये किलो मागे आहे. लसूण किलोमागे 50 ते 60 रुपये आहे. जेवणात सर्रास वापरला जाणार्‍या टोमॅटोचा दर किलोमागे 60 रुपये इतका वाढला आहे. बहुतांश पदार्थात हमखास वापरल्या जाणार्‍या कोथिंबिरीची जुडी 25-30 रुपये इतकी झाली आहे. भेंडी, कारले, वांगी, मिरची (हिरवी) यांचा दर 40-50 रुपये प्रतिकिलो आहे. लिंबाचा दर आकारमानानुसार असुन, 10 ला 5 लहान लिंब तर मोठी लिंबे 20 रुपयांला पाच अशी आहेत.

पावसाळ्यात लागणार्‍या मसाल्यातील सुकी मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली. त्यामध्ये प्रकारानुसार किलोमागील दरात फरक असून, बेडगी मिरची 250, संकेश्वरी मिरची 220, काश्मिरी मिरची 320 ते 400 रुपये असा आहे. सुक्या खोबर्‍याचा दर किलोमागे 150 ते 180 दरम्यान आहे. पावसाळ्यात सुक्या मच्छिवर खवय्यांचा जोर असतो. त्यामुळे ती घेण्यासाठी नागरिकांची लगबग यावेळी आठवडा बाजारात दिसून आली. सुका बोंबील, कोलीम, आंबडकाड, चेवनी, म्हाकुळ आदी मासळींना मोठी मागणी आहे.

Back to top button