दापोली पोलीस स्टेशनच्या आग प्रकरणात एसीपी गर्ग यांची भूमिका संशयास्पद ; माजी खासदार निलेश राणे यांचे गंभीर आरोप | पुढारी

दापोली पोलीस स्टेशनच्या आग प्रकरणात एसीपी गर्ग यांची भूमिका संशयास्पद ; माजी खासदार निलेश राणे यांचे गंभीर आरोप

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : दापोली पोलीस स्थानकाला काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेला वेगळे वळण लागले असून यात पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची भूमिका संशयस्पद असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. तर रत्नागिरीच्या कारागृहात असलेल्या प्रदीप गर्ग या कैद्याचा एसपींशी कोणता संबंध आहे असा सूचक सवाल उपस्थित केला आहे.

14 मे 2022 या दिवशी सकाळी दापोली पोलीस स्थानकाला आग लागली आणि त्यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे जाळून गेली. गेले दीड वर्षांपासून दापोली पोलीस स्थानक हे महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती आहे. तालुक्यातील आसूद येथे पालकमंत्री अनिल परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचे आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे या दापोली पोलीस स्थानकात असताना आणि हे प्रकरण शेवटच्या टप्प्यावर असताना येथील कागदपत्रे 14 मे रोजी लागलेल्या अगीत जाळून गेल्याची भीती स्वतः किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

याचवेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी यांनी डॉ. गर्ग यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. एसपींचे सरकारी निवासस्थान दापोलीपासून तब्बल 4 तासांच्या अंतरावर असताना एसीपी आग लागल्यानंतर अवघ्या अर्ध्य तासात घटनास्थळी कसे पोहोचले ? पोलीस स्थानकाला आग लागणार याची माहिती त्यांना होती का असा थेट सवाल निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणी गेले दोन महिन्यांपासून एसपींच्या दापोली फेऱ्या का वाढल्या, दापोलीत सरकारी निवासस्थानाऐवजी खासगी रिसॉर्ट मध्ये राहणाऱ्या एसपींची बिले, त्यांचा खर्च कोण भागवतं, त्यांच्या रत्नागिरीतील कार्यालयच्या नूतनीकरणासाठी मटेरियल कोणी दिले, त्याची बिले कोण भारतायेत? पोलीस वेलफेअर फंडाचा पैसा गर्ग कुठे कुठे वळवतायेत असे सवाल उपस्थित करत यावर रत्नागिरीत येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे दापोली पोलीस स्थानक आगीच्या प्रकरणाला वेगळे आणि गंभीर वळण लागले आहे. रत्नागिरीच्या कारागृहमध्ये प्रदीप गर्ग नावाचा फसवणूकीच्या केसमध्ये दखल झालेल्या कैद्याला गर्ग या आडनावामुळे विशेष ट्रीटमेंट मिळत आहे. या प्रदीप गर्ग आणि एसीपी गर्ग यांचा काय संबंध आहे ते सुद्धा आपण या पत्रकार परिषदेत उघड करणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button