रत्नागिरी : सोने व्यापार्‍याची बॅग लांबवणारे ६ संशयित पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

रत्नागिरी : सोने व्यापार्‍याची बॅग लांबवणारे ६ संशयित पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेप्रवासादरम्यान सोने व्यापार्‍याची 27 लाख 86 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लांबवणार्‍या 6 संशयितांच्या सांगलीतून मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आल्याची माहिती पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या कारवाईत शंभर टक्के रोख रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून गुन्ह्यात वापरलेली 5 लाखांची गाडी असा एकूण 32 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुरज हसबे, (22,मुळ रा.सांगली सध्या रा.केरळ), उमेश सुर्यगंध (34), अजय शिंदे(21), तुषार शिंदे (22), यश वेदपाठक (19) आणि विकास चंदनशिवे (23,सर्व रा.खानापूर,सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चोरीची ही घटना 1 मे रोजी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली होती. प्रशांत भिमराव माने आणि विनोद रावसाहेब महिम हे दोघे जामनगर तिरुवल्ली एक्सप्रेसने रत्नागिरी ते केरळ असा प्रवास करत होते. ते सोने तपासणी करण्याचे होलमार्क मशिन खरेदी करण्यासाठी आपल्या जवळील बॅगमध्ये 27 लाख 86 हजार रोख रक्कम घेऊन जात होते. बॅग ठेवून ते बाथरुमध्ये गेले असताना अज्ञाताने त्यांची बॅग लांबवली. बाथरुममधून बाहेर आल्यावर त्यांना आपली बॅग चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती.

ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथकाचे पोलिस उप निरीक्षक शांताराम महाले, पोलिस उप निरीक्षक आकाश साळुंखे, पोलिस हवालदार प्रविण बर्गे, पोलिस नाईक गणेश सावंत, विलास जाधव यांनी केली.

रोख रक्कम चोरीच्या गुन्ह्यात शंभर टक्के पैशांची पुनर्प्राप्ती ही दुर्मिळ घटना आहे. या गुन्ह्याच्या तपासातील पथकाने अशी कौतुकास्पद कामगिरी केल्याने पोलिस दलातर्फे या पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.                                    –  मोहित कुमार गर्ग, पोलिस अधिक्षक

Back to top button