रत्नागिरी : आंबा फवारणीसाठी आता ड्रोनचा वापर | पुढारी

रत्नागिरी : आंबा फवारणीसाठी आता ड्रोनचा वापर

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी मंत्रालयाने आता ड्रोनचा वापर करण्याला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ही मान्यता देण्यात आली आहे. कोकणात आंबा फवारणीसाठी हे तंत्र वापरण्यासाठी बागायतदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

शेतकरी आता शेती कामांमध्ये ड्रोनचा वापर करू शकतात. यासाठी काही अटी, शर्तीवर ही मान्यता दिली आहे. ही मान्यता केवळ किटकनाशके फवारणीसाठी देण्यात आली आहे. त्यातही 477 प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी यामध्ये समाविष्ट आहे.

काही प्रभावी आणि सुरक्षित असे नियम पाळून शेतकर्‍यांना शेतात ड्रोनद्वारे फवारणी करता येणार आहे. याचा नेमका अभ्यास करून कोणकोणत्या कामासाठी शेतीमध्ये ड्रोनचा वापर करता येईल, त्यानुसार पुढच्या टप्प्यात परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये पीक फवारणी क्षेत्र, फ्लाय क्लिअरन्स, वजनाची मर्यादा, नोंदणी आणि सुरक्षा विमा व त्यासोबत हंगामी परिस्थितीचा उल्लेख याचा समावेश नियमावली तयार करताना करण्यात आला आहे. अगदी ड्रोन उडवण्यासाठी आणि खाली उतरताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबद्दल देखील नियमावली ठरवून देण्यात आली आहे.

कोकणात आंबा फवारणीसाठी हे तंत्र वापरण्यासाठी बागायतदारांना प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. त्यासाठी कोकणातील शेतकर्‍यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच आयोजित करण्यात येणार्‍या आंबा महोत्सवात या तंत्रांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणाद्वारे देण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे.

ड्रोनचा वापर करताना शेतकर्‍यांना काही नियम देखील पाळावे लागणार आहेत. ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांचा वापर केल्याने विविध प्रकारच्या कीटकांपासून पिकांचे अगदी प्रभावीपणे बचाव करणे सोपे होणार आहे. याद्वारे अगदी कमी खर्चात उत्पन्न वाढण्यास देखील मदत होणार आहे.
– सुनंदा कुर्‍हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक

Back to top button