रत्नागिरी : वाहन चालकांकडून सहा कोटींचा दंड वसूल | पुढारी

रत्नागिरी : वाहन चालकांकडून सहा कोटींचा दंड वसूल

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मागील सव्वा वर्षात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणार्‍या 1 लाख 94 हजार 24 वाहन चालकांना तब्बल 6 कोटी 13 लाख 19 हजार 150 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यामध्ये विना हेल्मेट वाहन चालकांची संख्या सर्वाधिक आहे.

रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी नियमावली तयार केली आहे. गेली अनेक वर्षे काही सुधारणा वगळल्या तर नियम ‘जैसे थे’ आहेत. असे असतानाही नियम तोडणार्‍या वाहन चालकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. नियम तोडणार्‍या वाहन चालकांमुळे दंडाच्या रूपाने सरकारची तिजोरी भरत असली तरी वाहन चालकांना शिस्त लागणार कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सन जानेवरी 2021 ते मार्च 2022 या सव्वा वर्षाच्या कालवधीत जिल्हा वाहतूक शाखेने 1 लाख 94 हजार 24 वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

उल्लंघन प्रकरणी वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईत 6 कोटी 13 लाख 19 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना 1 कोटी 74 लाख 78 हजार दंड, चारचाकी वाहनात सिटबेल्ट न वापरणार्‍या वाहन चालकांना 26 लाख 75 हजारांचा दंड, दुचाकी, चारचाकी चालवताना मोबाईलचा वापर करणार्‍या वाहन चालकांना 2 लाख 24 हजारांचा दंड, इन्शूरन्स नसताना वाहन चालविणे 10 लाख 8 हजार 800 रु. दंड, परवाना नसताना वाहन चालविणे 27 लाख 55 हजार रु.दंड, फॅन्सी नंबर प्लेट लावणार्‍या वाहन चालकांना 17 लाख 27 हजार रु.दंड व इतर नो पार्किंग, दुचाकीवर ट्रिपल सीट, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, अति भरधाव वेग अशा एकून 1 लाख 94 हजार 24 वाहनचालकांना दंड करण्यात आला आहे.

यापूर्वी वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात होता. मात्र वर्षभरापूर्वी ऑनलाईन चलन पद्धत आल्याने वाहन चालकांशी वाद न घालता केवळ वाहनाचा फोटो मारुन कारवाई करणे वाहतूक पोलिसांना शक्य झाले आहे. मात्र ज्या कारणासाठी दंड करण्यात येणार आहे. ते कारण दर्शविणार फोटो करवाईसाठी आवश्यक आहे. त्यानंतरच वाहतूक शाखेला वाहन चालकांना दंड करता येणार आहे.

वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर वाहन मालकाला त्याच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज जातो. मात्र मेसेज आल्यानंतरही दहा ते पंधरा दिवसात दंड न भरल्यास आता थेट न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी वाहतुक शाखेने सुरु केली आहे. त्यामुळे आता दंड न भरल्यास कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

Back to top button