मासेमारी नौकांना वार्‍याचा अडथळा | पुढारी

मासेमारी नौकांना वार्‍याचा अडथळा

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : मच्छीमार नौकांवर काम करणारे खलाशी रत्नागिरीत वेळेत पोहोचलेले नाहीत. त्याचबरोबर जोरदार वारे आणि पावसाचा इशारा असल्याने गेल्या दोन दिवसांत प्रत्येकी 100 ते 150 मच्छीमार नौकाच समुद्रात मासेमारी साठी गेल्या.

रविवारी गणपतीपुळे-नेवरे दरम्यानच्या समुद्रात ट्रॉलर मच्छीमार नौका इंजिन बंद पडल्याने भरकटल्याची माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त एन. व्ही. भादुले यांनी दिली.

दि 1 ऑगस्टपासून पावसाळी मासेमारी बंदी उठली. पर्ससीन, मिनी पर्ससीन नेट नौका वगळता इतर नौका समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास सज्ज होत्या; परंतु नौकांवर काम करणारे खलाशी रत्नागिरीत वेळेत पोहोचलेले नाहीत.

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या नियमांमुळे हा वेळ होत असल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर समुद्रात जोरदार वारे वाहत असून, पावसाचाही इशारा असल्याने नौका मालकांनी सावधगिरीची भूमिका घेतली. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी जिल्ह्यातील सुमारे 100 ते 150 नौकाच मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या.

मासेमारी करत असताना साखरतर येथील एका मच्छिमार ट्रॉलर नौकेचे इंजिन बंद पडले. गणपतीपुळे-नेवरे दरम्यानच्या समुद्रात ही घटना घडली. नौकेवरील कामगारांनी नांगर टाकून ट्रॉलर थांबवण्यााचा प्रयत्न केला.

परंतु, जोरदार वार्‍यांच्या मार्‍यामुळे हा ट्रॉलर भरकटत तेथे जवळच किनार्‍यावर येऊन वाळूत अडकला. सुदैवाने ही नौका भरकटत समुद्रातील कोणत्याही खडकावर न आदळल्याने मोठी दुर्घटना टळली.

ट्रॉलर भरकटल्यानंतर त्यावरील खलाशांना आणण्यासाठी जाणारी होडीही उलटून अपघात झाल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे. या दोन्ही घटनांवरून समुद्रातील वार्‍याचा वेग किती जोरदार होता याचा अंदाज येऊ शकतो.

एकीकडे मच्छिमार नौकेवर काम करण्यासाठी खलाशी आले नसल्याने आणि जोरदार वार्‍यांच्या इशार्‍यामुळे बहुतांश मच्छिमार नौका जेटी आणि बंदरात उभ्या आहेत. पर्ससीन नेट आणि मिनी पर्ससीन नेट नौकांची मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने या नौकाही समुद्रात उभ्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन, मिनी पर्ससीन आणि इतर पारंपरिक नौका मिळून 3077 मच्छिमार नौका आहेत. त्यामध्ये सुमारे 280 पर्ससीन नौका आहेत. या नौकांची मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. उर्वरित 2797 नौकांपैकी गेल्या दोन दिवसात प्रतिदिन 100 ते 150 नौकाच समुद्रात मासेमारीसाठी जात असल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्‍तांनी सांगितले.

Back to top button