चिपळूण: मुंबईत असे ‘धोबीपछाड’ करा...! | पुढारी

चिपळूण: मुंबईत असे ‘धोबीपछाड’ करा...!

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सकाळी (दि. 30) सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टला भेट दिली. यावेळी येथील चित्र-शिल्प पाहून ते भारावून गेले. प्रदर्शनाचा आस्वाद घेत असतानाच येथील अनिकेत बोबले याने बनविलेले कुस्तीमधील ‘धोबीपछाड’ हे शिल्प पाहून त्याचे कौतुक करतानाच अशाप्रकारचे ‘धोबीपछाड’ मुंबईत व्हावे असे उद्गार काढून विरोधकांना कोपरखळी लगावली. त्यांच्या या वाक्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

युवा सेनेचे प्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवस कोकण दौर्‍यावर आहेत. आज सकाळी ते चिपळूण दौर्‍यावर आले असता सकाळी 10 वा. सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टला त्यांनी भेट दिली.

या आधी स्व. गोविंदराव निकम समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्र-शिल्प प्रदर्शन पाहिले. मुळातच कुटुंब कलासक्त असल्याने त्यांनी प्रत्येक चित्र व शिल्पाची जवळून पाहणी केली व अभिप्राय नोंदविला. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून देखील त्यांनी कला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच चित्र-शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांच्याशी मुक्त संवाद साधला.

येथील चित्र व शिल्प समजून घेतली. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या धर्तीवरच हे महाविद्यालय काम करीत आहे, असे उद्गार काढतानाच त्यांचे लक्ष एका कुस्तीच्या शिल्पाकडे गेले.

यावेळी ही कलाकृती तयार करणारा विद्यार्थी अनिकेत बोबले याचे कौतुक करतानाच अशाप्रकारचे धोबीपछाड मुंबई येथे व्हावे असे उद्गार काढले. त्यांच्या या प्रतिक्रियेने उपस्थितांमध्ये हंशा पिकला. त्यांनी आपल्या वाक्यातून एक प्रकारे विरोधकांना टोलाच लगावला.

यावेळी ना. उदय सामंत, पालकमंत्री अनिल परब, खा. विनायक राऊत, आ. शेखर निकम, आ. राजन साळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी सभापती पूजा निकम, प्राचार्य माणिक यादव व सर्व प्राध्यापक आदी उपस्थित होते. यावेळी निकम कुटुंबीयांकडून ना. ठाकरे यांना वृक्षरोप देऊन गौरविण्यात आले आणि विद्यार्थ्यांना देखील शुभेच्छा दिल्या.

Back to top button