राजापूर तालुक्यात सलग बारा दिवस पूरस्थिती

राजापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असून, सलग बाराव्या दिवशीही शहरात पूरसद‍ृश स्थिती आहे. मंगळवारी सायंकाळनंतर जवाहर चौकापर्यंत आलेले पुराचे पाणी बुधवारी सकाळपर्यंत ओसरलेले असताना सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा सायंकाळी पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते.

राजापूर तालुक्यात गेले दोन आठवडे सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहराला पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या दोन आठवड्यांत जवळपास चार वेळा पुराचे पाणी जवाहर चौकाच्या वरपर्यंत आले आहे. तर, जवळपास बारा दिवस चिंचबांध वरची पेठ रस्ता तसेच जवाहर चौकातील नदीकिनार्‍यालगतच्या टपर्‍या पुराच्या पाण्याखाली आहेत.

त्यामुळे या व्यापार्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यामुळे सायंकाळी कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकाच्या पुढपर्यंत आले होते. त्या नंतर रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने बुधवारी सकाळपर्यंत पुराचे पाणी कमी झाले होते.

मात्र, सकाळी पुन्हा पावसाने जोर धरल्याने सायंकाळी पुराच्या पाण्याने पुन्हा जवाहर चौकापर्यंत धडक दिली. त्यामुळे शिवाजीपथ, बंदरधक्का, वरचीपेठ, गुजराळी रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, या मुसळधार पावसामुळे डोंगर-विखारे गोठणे रस्ता पुन्हा खचला आहे तर कोंड्ये तर्फे सौंदळ येथील मनेश कोंडकर यांच्या घराच्या पडवीवरील छप्पर कोसळल्याने नुकसान झाले आहे.

Back to top button