भेगेत मुरले पाणी, ‘भुईबावडा’ ची करुण कहाणी | पुढारी

भेगेत मुरले पाणी, ‘भुईबावडा’ ची करुण कहाणी

वैभववाडी ; मारुती कांबळे : भुईबावडा घाटमार्गात भेगा पडून, त्यात पाणी मुरून एका ठिकाणी संपूर्ण रस्ताच खचल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अवजड वाहतुकीसाठी तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे व आधार भिंती कोसळलेल्या आहेत. खचलेल्या साईडपट्ट्या, गाळाने भरलेली गटारे व पावसाळ्यात वारंवार कोसळणार्‍या दरडी, यामुळे या घाटातून प्रवास करणे हलक्या वाहतुकीसाठीही जीवघेणे ठरत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातून कोकणात प्रवेश करताना वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा व करूळ हे दोन मुख्य घाटमार्ग आहेत. दोन्हीही घाटांच्या कामाची सुरुवात 1957 मध्ये करण्यात आली. 1965 मध्ये दोन्ही घाट एकाचवेळी वाहतुकीसाठी खुले झाले. भुईबावडा घाटमार्ग 12 कि.मी. लांब व 3.5 मीटर रुंदीचा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनेक गावांना सोयीचा आहे. कोकणातील जनता व्यापार, शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या सेवासुविधांसाठी कोल्हापूर जिल्ह्यावर अवलंबून आहे. कोकणातून होणारी ऊस, लाकूड, बांबू, आंबा वाहतूकही या घाटातून होत असे. मात्र, दोन वर्षांपूर्वी घाटात ऐनारीपासून 5 कि.मी. अंतरावर रस्त्यावर मधोमध भेग गेली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ती बुजविलीही होती. मात्र, गेल्या पावसाळ्यात या भेगेत पाणी जाऊन 200 फूट लांबीचा रस्ताच खचला.

खचलेल्या रस्त्याची पाहणी केंद्रीय पथकाने ऑगस्टमध्ये केली होती. ते राज्य शासनाला याबाबत अहवाल सादर करणार व त्यानंतर त्यांनी सुचविल्याप्रमाणे उपाययोजना करण्यात येणार आहेत. तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पर्याय म्हणून करूळ घाटमार्ग असल्याने या घाटमार्गाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुजाभावाची वागणूक दिली जाते, असा आरोप भुईबावडा दशक्रोशीतील ग्रामस्थ करतात.

धुक्यात हरवते वाट!

अरुंद घाटरस्त्याच्या एका बाजूला खोल दरी, तर दुसर्‍या बाजूला उंच डोंगर कडेकपारी आहेत. घाटात अनेक यू आकाराची व नागमोडी वळणे आहेत. ही वळणे दर्शविणारे फलक आवश्यक आहेत. रात्रीच्या वेळी घाटात दाट धुके असते. या धुक्यातून वाहन चालविताना रस्त्याचा नीट अंदाज येत नाही. यासाठी साईडपट्टीवर रेडियमचे पट्टे आवश्यक आहेत.

Back to top button