खेड : पर्यटकांना खुणावणावतोय 'निरीबजी' धबधबा - पुढारी

खेड : पर्यटकांना खुणावणावतोय 'निरीबजी' धबधबा

खेड : अनुज जोशी

सह्याद्री पर्वत रांग जेवडी कणखर तेव्हडीच सात्विक व सुंदर आहे. या रांगांमध्ये निसर्गाने अनेक चमत्कार घडवून ठेवले आहेत. खेड तालुक्यातील कांदोशी हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून येथील सात्विक ‘निरीबजी धबधब्याचा’ तिर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा असा प्रयत्न येथील ग्रामस्थ करत आहेत. धार्मिक पर्यटन क्षेत्र विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना निसर्ग सौंदर्याने नटलेला धबधबा व तेथील पुरातन शिवलिंग नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही.

खेड तालुक्याला सातारा जिल्ह्याच्या बाजूने सह्याद्री पर्वत रांगेची भक्कम तटबंदी लाभलेली आहे. येथे जैवविविधतेने नटलेल्या उत्तुंग पर्वत रांगांमध्ये रसाळगड, सुमारगड, महिपतगड, पालदुर्ग आदी इतिहासाची साक्ष देणारे किल्ले पर्यटकांना आकर्षित करतात. रत्नागिरी व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या पर्वत रांगांमध्ये कांदोशी हे गाव वसलेले आहे. याचं गावात सह्याद्रीच्या खोऱ्यात तीनशे ते साडे तीनशे फुटवरून कोसळणारा निरीबजी धबधबा आहे. कड्या वरून कोसळणाऱ्या धबधब्याने सुमारे पन्नास फूट लांब व १० फूट रुंद नैसर्गिक गुहेची निर्मिती केली आहे.

या गुहेत शेकडो वर्षांपूर्वी अज्ञात तपस्वीनी शिवपिंडची प्रतिष्ठापना केली. स्थानिक ग्रामस्थ व काही योगीपुरुष वगळता गेली अनेक वर्षे या धबधब्याची माहिती जगापासून अज्ञात होती. काही दशकांपूर्वी या धबधब्याच्या गर्भात प्रतिस्थापन केलेले शिवलिंग जीर्ण झाल्याचे समजल्यावर श्री संत श्रीपादनन्द यांनी या ठिकाणी पाषाणाच्या नवीन शिवलिंगाची स्थापना केली आहे. महाशिवरात्रीला काही स्थानिक ग्रामस्थ येथे दरवर्षी पूजन करतात.

खेड शहरापासून सुमारे पस्तीस किमी अंतरावर कांदोशी गाव वसले आहे. या गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वत शृखलांमध्ये एका उंच कड्यावरून हा निरीबजी धबधबा प्रवाहित होतो. शिवपिंडीवर बारा महिने नैसर्गिकरित्या जलाभिषेक होताना पाहायला मिळतो. आजुबाजूचा परिसर तर स्वगपिक्षा कमी नाही. उंचावरून पडणाऱ्या धबधब्यामुळे त्या ठिकाणी एक पाण्याचे तळे तयार झाले असून निळ्याशार पाण्याच्या तळ्याचे सौंदर्य मन मोहवून टाकते.

या ठिकाणी पोहोचणे दुर्गम असल्याने धाडसी गिर्यारोहक स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने, जंगल पार करून, तीन ते चार तासांच्या प्रवासानंतर तेथे पोहचतात. हे ठिकाण केवळ पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या कांदोशी गावातील काही लोकांनाच माहीत होते. मात्र काही ट्रेकर्स सह्याद्रीची सफर करत त्या ठिकाणी पोहोचले आहेत.

त्यांनतर या निसर्गाच्या आविष्काराने नटलेल्या परिसराची माहिती पसरु लागली आहे. उंचावरून कोसळणारा धबधबा त्यामुळे खोदली गेलेली गुहा आणि या गुहेच्या आतमध्ये शिवपिंड आणि त्या पिंडीवर नैसर्गिकरित्या होणारा जलाभिषेक, याच गुहेसमोर निर्माण झालेला नैसर्गिक तलावातील पाणी निखळ, स्वच्छ आणि अत्यंत थंड, आजुबाजूला नयनरम्य जंगलाचा परिसर आता सर्वांच्याच मनाला भुरळ घालणारा आहे. अशा आविष्कारी आणि पर्यटकांच्या दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्व असलेली अशी ठिकाणे त्यांचा विकास करून जगासमोर आणल्यास कोकण पर्यटनाच्यादृष्टीने जागतिक पातळीवर पोहोचेल यात शंका नाही.

निसर्गाने मुक्तहस्त कांदोशी गावात सौंदर्याची उधळण केली आहे. येथील देवस्थान पवित्र तीर्थस्थान असून घनदाट अरण्यातील निरीबजी धबधबा सात्विक स्थान आहे. या परिसराचा तीर्थस्थान पर्यटनस्थळ म्हणून आम्ही लोकसहभागातून विकास करत आहोत. त्यासाठी राज्य सरकारचा हातभार लाभावा म्हणून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे, पालकमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन माहिती देणार आहोत, असे कांदोशीचे मूळ रहिवासी व ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे यांनी दैनिक पुढारी सोबत बोलताना सांगितले.

कांदोशी गावातील निरीबजी धबधबा हे एक पवित्र व सात्विक सौंदर्याने नटलेले स्थान आहे. धाडसी गिर्यारोहण करणारे पर्यटक या ठिकाणापर्यंत स्थानिकांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचू शकतात मात्र येथील नैसर्गिक सौंदर्य, पावित्र्य जपणे गरजेचे आहे. येथील वन्यजीव, वनस्पती या दुर्मिळ असून त्यांना कोणतीही इजा न पोहोचवता येथील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा अशी प्रतिक्रिया आदित्य मोरे या तरुण गिर्यारोहकाने दैनिक पुढारी सोबत बोलताना दिली.

Back to top button