सिंधुदुर्ग : राणेंना धक्‍का; पण भाजप वाढली! | पुढारी

सिंधुदुर्ग : राणेंना धक्‍का; पण भाजप वाढली!

सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने वाढले आहेत; मात्र कुडाळ आणि देवगड नगरपंचायत गमावल्याने राणे यांना धक्‍का बसला आहे. अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या देवगड-जामसंडे, वैभववाडी, कुडाळ आणि कसई-दोडामार्ग या चार नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

यात देवगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने 17 पैकी 9 जागा जिंकून भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. वैभववाडी आणि कसई-दोडामार्ग या नगरपंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने शिवसेनेसह आघाडीला जोरदार धक्‍का दिला. जिल्ह्यात अटीतटीच्या मानल्या गेलेल्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

भाजपला सर्वाधिक 8, शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेची संधी असून सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे आल्या आहेत. जिल्ह्यातील चारही नगरपंचायतींचे निकाल पाहता भाजप आणि महाविकास आघाडीला जवळपास 50-50 टक्के कौल मतदारांनी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या चारही नगरपंचायतींमध्ये मागील पाच वषार्र्ंतील स्थिती पाहता देवगड, कुडाळ आणि वैभववाडी या तिन्ही ठिकाणी नारायण राणे यांचे वर्चस्व राहिले होते. त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते, तर कसई-दोडामार्गमध्ये भाजप-शिवसेना युतीने बहुमत मिळवले होते. मात्र, नगराध्यक्षपदावरून झालेल्या वादात काँग्रेसचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसला होता; मात्र पाच वर्षांत अनेक राजकीय समीकरणे बदलली.

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला आणि नंतर गेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान ते भाजपमध्ये गेले. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष असे चित्र निर्माण झाले आणि तशाच लढती अलीकडेच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत पाहायला मिळाल्या.

देवगडमध्ये आ. नितेश राणे यांना शिवसेना-राष्ट्रवादीचा धक्‍का

2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत देवगड-जामसंडे नगरपंचायतीवर राणेंची अर्थात काँग्रेसची सत्‍ता होती. 17 पैकी 10 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. त्यावेळी शिवसेनेचा अवघा 1 सदस्य, भाजपचे 4, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1 असे चित्र होते. यावेळची निवडणुक भाजप विरूद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी यांच्यात झाली. या निवडणुकीत दोन्ही बाजूने ताकद लावण्यात आली होती.

शिवसेनेने यावेळी जोरदार मुसंडी मारत 8 जागा जिंकल्या आणि भाजपला सत्‍तेपासून रोखलेच. या ठिकाणी भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. येथे राष्ट्रवादीनेही चांगली कामगिरी करत 1 जागा जिंकली आणि महाविकास आघाडीसाठी सत्‍तेचे सोपान सुकर केले.

आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील देवगड नगरपंचायतीवरची भाजपची सत्‍ता आघाडीने स्पष्ट बहुमाताने जिंकत राणेंना जोरदार धक्‍का दिला. या ठिकाणी भाजपच्या काही विद्यमान नगरसेवकांबद्दलची जनतेतील नाराजी भाजपला भोवली तर शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नियोजनबद्ध मेहनतीला यश आले. आघाडी करून निवडणुक लढवण्याचा निर्णय येथे यशस्वी झाला.

वैभववाडीत राणेंचेच वर्चस्व : भाजपने सत्ता राखली

मागील निवडणुकीत वैभववाडी नगरपंचायतीमध्ये काँग्रेस 5, शिवसेना 2, भाजप 6, गाव पॅनल 4 असे पक्षीय बलाबल होते. त्यावेळी सेना-भाजपला सर्वाधिक जागा असल्या तरी आ. नितेश राणे यांनी गाव पॅनलच्या जोरावर वैभववाडीची सत्‍ता हस्तगत केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात काही राजकीय स्थित्यंतरेही झाली. शिवसेनेने या ठिकाणी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

भाजपने आ. नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली तर शिवसेनेने अतुल रावराणे यांच्या खांद्यावर धुरा दिली होती. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी भाजपला 10 जागांवर विजय मिळवून देत पुन्हा एकदा सत्‍ता राणेंच्याच हातात दिली तर शिवसेनेला अवघ्या 5 जागा जिंकता आल्या. दोन अपक्षांनी विजय मिळवला. शिवसेनेला या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, भाजपने सत्‍ता राखत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.

कुडाळमध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत नाही

कुडाळ नगरपंचायतीवर मागील वेळेस राणेंच्या काँग्रेसला 9, शिवसेनेला 6, भाजप 1 आणि अपक्ष 1 असे पक्षीय बलबल होते. या ठिकाणी राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्‍ता प्रस्थापित केली होती. मात्र यावेळची निवडणूक शिवसेनेसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली होती तर काँग्रेस स्वतंत्रपणे लढली.

या निवडणुकीसाठी शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांनी प्रतिष्ठा पणास लावत कोणत्याही परिस्थितीत कुडाळ न.पं.वर सत्‍ता आणायचा असा चंग बांधला होता तर भाजपनेही सत्‍ता कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती, मात्र भाजपला पक्षांतर्गत बंडखोरीचे आव्हान या ठिकाणी होते. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 8 जागा जिंकल्या तर शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आणि काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले.

शिवसेना आघाडीने या ठिकाणी भाजपला रोखले खरे परंतु या ठिकाणी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्‍तेच्या चाव्या काँग्रेसकडे आहेत. काँग्रेस राज्यात आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेनेला साथ देण्याची शक्यता आहे. अर्थात याबाबतचे अंतिम चित्र निवडणुकीवेळीच स्पष्ट होणार आहे. मात्र, भाजपला या ठिकाणी धक्‍का बसला हे ही तितकेच.

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

मागील निवडणुकीत दोडामार्ग नगरपंचायतीवर तत्कालीन सेना-भाजप युतीला बहुमत मिळाले होते. त्यावेळी काँग्रेसला 4, सेना, भाजपला प्रत्येकी 5, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि मनसेला 1 जागा मिळाली होती. मात्र, त्यावेळी नगराध्यक्षपदावरून सेना, भाजपमध्ये झालेल्या वादाचा फायदा घेत काँग्रेसने आपला नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसवला होता. यावेळीच्या निवडणुकीत भाजप विरूद्ध आघाडी असे उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेसह आघाडीला धोबीपछाड करत भाजपला 13 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवून दिले. येथे शिवसेनेला केवळ 2 जागा, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या. या निवडणुकीत माजी मंत्री दीपक केसरकर यांचा करिश्मा अजिबात चालला नाही हे विशेष. दोडामार्ग भाजपमध्ये गटबाजी असतानाही नगरपंचायतीवर भाजपने मिळवलेले बहुमत निश्‍चितच पक्षाचे बळ वाढवणारे आहे. तर शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही मतदारांनी जागा दाखवून दिली आहे.

कुडाळात महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार ः आ.वैभव नाईक

कुडाळ नगरपंचायतीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो आणि जनता व मतदार यांचे आभार मानतो. या निवडणुकीत जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. राज्यात जशी महाविकास आघाडीची सत्ता आहे तशीच महाविकास आघाडीची सत्ता कुडाळ नगरपंचायतीवर स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सत्ता स्थापनेसाठी निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना आ. वैभव नाईक यांनी दिली.

कुडाळ नगरपंचायतवर भाजप सत्ता स्थापन करणार ः रणजित देसाई

कुडाळ न. पं. निवडणुकीत जनतेने भाजप 8, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी 7 व राष्ट्रीय काँग्रेस 2 अशा जागांवर कौल दिला आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो. आमच्या काही जागा कमी मतांच्या फरकाने गेल्या. मात्र, दोन प्रभागांत काँग्रेसने चांगले काम करून विजय मिळवला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून भाजप व जे आमच्यासोबत कोण येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही सत्ता स्थापनेचा निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे जि. प. गटनेते रणजित देसाई यांनी दिली.

Back to top button