Jalna : मुलीच्या लग्नासाठी ठेवलेल्या २ तोळे सोन्यासह ८५ हजार रक्कमेवर चोरट्यांनी मारला डल्ला | पुढारी

Jalna : मुलीच्या लग्नासाठी ठेवलेल्या २ तोळे सोन्यासह ८५ हजार रक्कमेवर चोरट्यांनी मारला डल्ला

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : धाकलगाव येथे चोरट्यानी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले २ तोळे सोन्याचे दागिने व ८५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली. सलीम पठाण यांच्या घरात ही चोरी झाली. मंगळवारी (दि. २९) मध्यरात्री ही घटना घडली असून सलीम यांना रात्री जाग आली असता त्यांना ही चोरी झाल्याचे समजले.

अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील सलीम मन्सूर पठाण यांनी मुलीच्या लग्न कार्यासाठी घरात पैसे, सोने, साड्या, वस्तू ठेवल्या होत्या. याचठिकाणी शेतातील कापूस देखील ठेवलेला होता. या खोलीला बाहेरून कुलूप लावून सलीम यांचे कुटुंब दुसऱ्या खोलीमध्ये झोपले होते. ज्या खोलीमध्ये सलीम पठाण यांचे कुंटबीय झोपले त्या खोलीच्या बाहेरून चोरट्यांनी तसेच शेजारच्या घराला कड्या लावल्या. सलीम यांना सकाळी ३.३० वाजताच्या दरम्यान जाग आली. यावेळी त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून दरवाज्याला कडी लावल्याचे लक्षात आले. घराशेजारी असलेल्या नातेवाईकांना त्यांनी ही माहिती दिली.

त्यांनंतर ते नातेवाईकांच्या मदतीने कडी लावल्याने बंद असलेल्या घरातून सलीम यांची सुटका झाली. त्यानंतर घरापुढे सर्व सामानाची व कपड्यांची विसकटलेल्या स्वरुपात आढळून आले. या घटनेची माहिती गोंदी पोलीस ठाण्याला दिली असता, ज्या घरात चोरी झाली होती त्या घराचे कुलूप कटरने कापून सोने व रोख रकमेची चोरी झाल्याचे समजले. चोरांनी सर्व मुद्देमाल घेऊन रिकामी पेटी घरापासून १५० ते १६० फुटांवर टाकून पसार झाल्याचे तपासात समजले.

पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला. बुधवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा छडा लावण्याचे आश्वासन दिले. गेल्या महिन्याभरात या गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेले दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button