जळगाव : पांढर्‍या सोन्याचे दर घसरले; दिवाळीही कशीबशी साजरी | पुढारी

जळगाव : पांढर्‍या सोन्याचे दर घसरले; दिवाळीही कशीबशी साजरी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  खरिपातील सुमारे 60 टक्के कापूस शेतकर्‍यांच्या घरात आला आहे. त्यातील काही कापूस शेतकर्‍यांनी मिळेल त्या दरात विकून दिवाळ सण साजरा केला. तर काहींनी किमान 10 हजारांचा दर मिळावा, यासाठी कापूस विक्रीस काढत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या खंडीचे (दोन गाठी) दर 1 लाख 10 हजारांवरून 65 हजारांवर आले आहेत. त्यामुळे पांढर्‍या सोन्याचा 9 हजारांचा दर घसरून साडेसात ते आठ हजारांवर आला आहे.

गतवर्षी कपाशीला 13 हजारांपर्यंत भाव मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर कपाशीची पेरणी केली. त्यात परतीच्या पावसाने काही ठिकाणी कापसाचे मोठे नुकसान झाले. असे असले तरी कपाशीचे यंदा चांगले उत्पादन येत आहे. कापसाचा दर्जाही चांगला आहे. यामुळेच जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने यंदा 25 ते 30 लाख कापसाच्या गाठी निर्मितीचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. यामुळेच 30 लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने कपाशीत आर्द्रता निर्माण झाल्याने कपाशीचे भाव कमी झाले आहेत. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला भाव मिळत आहे.

आवक जास्त झाल्याने दरावर परिणाम

गतवर्षी कापसाला मिळालेल्या 13 हजारांपर्यंतच्या दरामुळे यंदा शेतकर्‍यांनी 10 ते 15 टक्के पेरा अधिक केला.
त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. कापसाला नऊ ते दहा हजारांच्या दराची अपेक्षा असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला सध्या मागणी कमी आहे. जर कापसाची आवक वाढली अन् आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी कमी राहिली तर सध्याच्या दरावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खंडीचे दर 1 लाख 10 हजारांवरून 65 हजारांवर आले आहेत

 

Back to top button