जालना : भर पावसात प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच रस्त्यावर गरोदर माताची प्रसुती | पुढारी

जालना : भर पावसात प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच रस्त्यावर गरोदर माताची प्रसुती

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने भर पावसात आरोग्य केंद्राच्या समोर रस्त्यावर गरोदर माताची प्रसुती झाल्याची घटना घडली. अंबड तालुक्यातील वडीगोद्री (जालना) येथे दि ३० जुलै रोजी रात्री ७:३० वाजता ही घटना घडली. आरोग्य विभागाचे धिंडवडे उडवणारा हा प्रकार झाला असून नातेवाईक व ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री (जालना) येथील गरोदर माता रुपाली राहुल हारे यांना त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्यांना वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्षाने आणले. यावेळी त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व महिला आरोग्यसेविका उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने रिक्षा आरोग्य केंद्राच्या बाहेरच थांबवलेली होती. दरम्यान रस्त्यावरच भर पावसात त्या गरोदरमातेची प्रसुती झाली. यानंतरही डॉक्टर व कर्मचारी यांना फोन केला असता एक तास कोणीही आले नाही. बराच वेळ गरोदर माता, बाळ व नातेवाईक भर पावसात उभे होते. त्यानंतर खाजगी महिला डॉक्टर व परिचारिका यांनी येऊन गरोदर मातेची नाळ कापली व त्यानंतर गरोदर माता व नवजात बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. यानंतर या गरोदर मातेची व बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

डॉक्टर व कर्मचारी नसल्याने माझ्या पत्नीची प्रसुती रस्त्यावर झाली आहे. हा गंभीर प्रकार असून ड्युटीच्या वेळेत ड्युटी वर नसलेल्या डॉक्टर व कर्मचारी यांना निलंबित करा, अन्यथा मी दवाखान्याला कुलूप ठोकणार.
राहुल हारे (गरोदर महिलेचे पती), वडीगोद्री,ता.अंबड

हेही वाचा

Back to top button