बेळगाव : अन्‍नातून विषबाधा; माय-लेकाचा मृत्यू | पुढारी

बेळगाव : अन्‍नातून विषबाधा; माय-लेकाचा मृत्यू

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : अन्‍नातून विषबाधा झाल्याने दीड तासाच्या अंतराने माय-लेकाचा मृत्यू झाला. पार्वती मारुती मळगली (वय 54) व त्यांचा मुलगा सोमलिंग मारुती मळगली (23, दोघेही रा. हुदली) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी पहाटे हुदली (ता. बेळगाव) येथे ही घटना उघडकीस आली.

मारीहाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पार्वती व त्यांचा मुलगा रामलिंग दोघेच घरी राहत होते. मुलीचे लग्‍न झाले असून, त्या अंकलगी (ता. गोकाक) येथे असतात. रविवारी रात्री आईने घरी भजी तळली.

पार्वती व मुलगा सोमलिंग दोघांनीही भजी खाल्ली आणि नेहमीप्रमाणे ते झोपी गेले. पहाटे चारच्या सुमारास सोमलिंगला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने आईला उठवले. मात्र, दवाखान्याला नेण्यापूर्वी घरातच पाचच्या सुमारास सोमलिंगचा मृत्यू झाला.

दीड तासाने आईचाही मृत्यू

तासाभराने आई पार्वती यांनाही त्रास सुरू झाला. त्यांना रुग्णालयाकडे नेण्यात आले. परंतु, त्यांचाही वाटेतच 6.30 च्या सुमारास मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह जेव्हा रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी अन्‍नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्‍त केला.

घटना मृत महिलेची मुलगी निर्मला अशोक पाच्छापुुरे यांना समजताच ती अंकलगीहून हुदलीला दाखल झाली. त्यानंतर निर्मला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारीहाळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक बी. एस. मंटूर तपास करीत आहेत.

दोघांच्या मृत्यूमुळे गांभीर्य

भजी खाल्ल्याने माय-लेकाचा मृत्यू झाल्याने हा चर्चेचा व तितकाच गंभीर विषय बनला आहे. डॉक्टरांनी हे फूड पॉयझनिंग असल्याचे सांगितले. परंतु, भजी तळताना तेल अथवा कालवलेल्या बेसन पिठात आणखी काही पडले होते का? या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

Back to top button