निपाणी : ...अखेर सीमावासीय उमेदवाराला मिळाला न्याय

निपाणी ; विठ्ठल नाईक : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत निपाणी जवळ असलेल्या शिरगुप्पी येथील अमोल चव्हाण याची साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली होती; पण मागासवर्गीय प्रवर्गातून झालेली निवड कर्नाटकातील रहिवासी असल्याचे सांगून रद्द करण्यात आली होती. निपाणी भागातील सीमावासियांना हा दिलासा मिळालआहे.

सदर उमेदवार सीमाभागातील रहिवासी असल्याने सीमावासीय विद्यार्थी व नोकरदार कृती समितीने महाराष्ट्र शासनाकडे न्यायासाठी दाद मागत संबंधितांना निवेदने देऊन धडपड केली. अखेर कृती समितीला यश मिळून अमोल चव्हाण याची विशेष बाबीतून निवड करीत सेवेत रुजू करून घेतले आहे.

अमोल चव्हाण याची महाराष्ट्रात मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भरतीसाठी सीमाभागातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गणले जाते.

त्याचा परिणाम अमोल चव्हाण याच्या निवडीवर झाल्याने कृती समितीने सीमाभागातील 865 गावांतील उमेदवारांना त्यांच्या प्रवर्गानुसार भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यासाठी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसह शासनाकडे पत्रव्यवहार केला.

सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थी हे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे पदवीधर आहेत. शिवाय सीमाभागातील 865 गावांवर महाराष्ट्र शासनाने हक्‍क सांगितल्याने त्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार सेवेत घेण्यासाठी कृती समिती कार्यरत आहे.

याबाबत कृती समितीचे प्रमुख प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय विद्यार्थी व नोकरदार कृती समिती स्थापन करून अनेकदा अर्जाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून न्यायाची मागणी केली. सामान्य प्रशासन विभाग व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

अखेर अमोल चव्हाण याची विशेष बाब म्हणून मोटार वाहन निरीक्षकपदी निवड करण्यात आली. त्याच्या नियुक्तीसाठी प्रा. डॉ. अच्युत माने, समिती सदस्य प्रा. शरद कांबळे, सुनील शेवाळे, अनिल मसाळे, प्रमोद कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आ. प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला.

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button