पैठण आगारातील एसटी बसवर दगडफेक; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

पैठण आगारातील एसटी बसवर दगडफेक; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पैठण; पुढारी वृत्तसेवा

राज्य परिवहन महामंडळाच्या पैठण आगारातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपात दोन चालक व वाहक यांनी शनिवारी रात्री फूट पाडून, पैठण ते पाचोड पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू केली होती. मात्र पैठण आगारातील या बसवर अज्ञात व्यक्तीने परतीच्या प्रवासात दगडफेक करून बसची पाठीमागील काच फोडली. त्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहक यांनी विविध मागण्यासाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली दि ६ नोव्हेंबर पासून लाक्षणिक संप पुकारून आंदोलन सुरू केले आहे. येथील आगार प्रमुखांनी सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस दिल्यामुळे दोन वाहक-चालक यांनी शनिवारी रात्री सात वाजता पुकारलेल्या संपाचे धोरण मोडीत काढून पैठण ते पाचोड क्र. बी.एल. २१७४ ही बस सेवा सुरू केली.

यावेळी प्रवासी नसल्यामुळे स्वतः आगर प्रमुख सुहास तरवडे यांनी प्रवासी बनून प्रवास केला. परंतु परतीच्या प्रवासामध्ये ही बस रात्री आठ तीस वाजता च्या दरम्यान पैठणकडे येत असताने पाचोड फाट्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये बसची पाठीमागील काच फुटून गाडीचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार बस चालक शुभम दादासाहेब बळवते यांनी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे दिली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

चालक – वाहक यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र

दरम्यान राज्यभर परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांचा संप कृती समितीच्या नेतृत्वाखाली शांततेत सुरू आहे. मात्र एसटीच्या काही अधिकाऱ्यांनी संपात फूट पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा आरोप केला. विना प्रवासी बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करून संपामध्ये सहभाग झालेल्या चालक वाहक यांच्यावर दबाव टाकण्याचा व संपाला बदनाम करण्यासाठी बसवर दगडफेक झाल्याची तक्रार उशिरा दाखल करण्यात आल्याने, संपात सहभाग झालेल्या चालक-वाहक यांच्यामध्ये आगारातील कर्मचाऱ्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. आज दिवसभर या आगारातून एकही बस धावली नाही.

हे ही वाचा :

Back to top button