औरंगाबाद : ३०-३० घोटाळा; शेतकऱ्यांचं दिवाळं; भामट्यांची समृद्धी | पुढारी

औरंगाबाद : ३०-३० घोटाळा; शेतकऱ्यांचं दिवाळं; भामट्यांची समृद्धी

बिडकीन : पुढारी वृत्तसेवा

मराठवाड्यात खळबळ उडवून देणारा ‘तीस-तीस’ घोटाळ्यातील पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलीसात दाखल झाला. या योजनेचा मोहरक्या संतोष उर्फ सचिन राठोड फरार झाला आहे. विशेष म्हणजे या सर्व योजनेत राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते मध्यस्थी म्हणून सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लवकरच आशा मध्यस्थींवर सुध्दा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.(औरंगाबाद लेटेस्ट न्यूज)

डीएमआयसी, समृद्धी महामार्ग, धुळे-सोलापूर हायवे अशा प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. अधिकचे व्याजदर देण्याचे आमिष दाखव कोट्यवधी रुपये घेऊन संतोष राठोड फरार झाला. याप्रकरणी औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एकूण पाचशे कोटींपेक्षा अधिकचा हा घोटाळा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हजारो शेतकरी या योजनेत अडकले आहेत.

या भागातील काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून राठोड याने आपलं नेटवर्क उभं केलं. विशेष म्हणजे मध्यस्थी करणाऱ्या या राजकीय नेत्यांना टक्केवारीनुसार कमिशन सुद्धा मिळायचे. स्थानिक नेत्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सुद्धा डोळे झाकून पैसे दिले. मात्र, आता गेली आठ महिने झाले परतावा मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. त्यातच आता धाडस करत एका महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

‘तीस-तीस’ घोटाळा म्हणजे काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने २०१६ मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी (DMIC) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव केला. त्याने शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं.

सुरुवातीला शेतकऱ्यांना महिन्याला ५ टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला २५ टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरुवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत ‘तीस-तीस’ नावाचा ग्रुप बनवला. मग, अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला.

लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले. ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे ३० गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याच काम या तरुणाने केलं.

काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला. उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यवधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली ८ महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.

Back to top button