राष्ट्रीय बालिका दिन विशेष : महाराष्ट्राच्या लेकींची फक्त एक रुपयांवर बोळवण | पुढारी

राष्ट्रीय बालिका दिन विशेष : महाराष्ट्राच्या लेकींची फक्त एक रुपयांवर बोळवण

औरंगाबाद; भाग्यश्री जगताप :  मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकणे आणि मुलींविषयी जनजागृती वाढवणे, मुलींच्या हक्कांबद्दल समजात जागरूकता वाढवणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण याविषयी समाजात जनजागृती करणे यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. मात्र, दुसरीकडे याच मुलींना गेल्या ३० वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत दररोज फक्त १ रुपया भत्ता दिला जात असल्याचे उघड झाले आहे.

दारिद्रयरेषेखालील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती- जमाती व भटक्या जमातीतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या एक रुपया प्रतिदिन प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. गेल्या ३० वर्षांपासून सुरू केलेल्या या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने आतापर्यंत एका पैशाचीही वाढ केलेली नाही. या योजनेही प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागांसह लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत नसल्याने विद्यार्थिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जिल्हा परिषद शाळांतील उपस्थिती वाढविण्यासाठी १९९२ साली तत्कालीन सरकारने प्रति विद्यार्थिनीला प्रतिदिन एक रुपया प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासनाने ही योजना सुरू केली. परंतु ३० वर्षांनंतरही या महाराष्ट्राच्या लेकींची बोळवण केवळ १ रुपयानेच केली जात आहे.

पालकांत तीव्र नाराजी

आज महागाईने कळस गाठला असून शैक्षणिक साहित्याच्या किमतीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पेनातील कांडीची किंमतदेखील एक रुपयापेक्षा जास्त आहे. तरीही आजपर्यंत कोणत्याच सरकारने विद्यार्थिनींच्या भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जाती जमातीतील पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलींना उपस्थितीसाठी एक रुपया प्रतिदिन भत्ता देण्यात येतो. एकीकडे १९९२ पासून आजपर्यंत या भत्यात वाढ झालेली नाही. तर दुसरीकडे हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याचे समोर आले असल्याने पालकवर्गात तीव्र नाराजी आहे.

Back to top button