आमचे पाय जमिनीवरच; नेमके हवेत कोण, याचा पवारांनीच तपास करावा : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

आमचे पाय जमिनीवरच; नेमके हवेत कोण, याचा पवारांनीच तपास करावा : उपमुख्यमंत्री फडणवीस

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा :  आमचे पाय जमिनीवरच आहेत. जमिनीवरील माणसांशी आमचा संपर्क आहे. नेमके हवेत कोण आहे, याचा त्यांनीच तपास करावा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला. मसिआच्या अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो या औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोपानिमित्त आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सत्ता हाती आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करायचे असते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले होते. त्याला फडणवीसांनी पवारांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. एक्स्पोच्या उद्घाटनाच्या वेळी आमच्या विमानात बिघाड झाला होता. त्यामुळे उद्घाटनाला येता आले नाही. मात्र, आम्ही केवळ सोय म्हणून विमान वापरतो. आम्ही जमिनीवरच आहोत आणि जमिनीवर राहणार असल्याचे सांगत फडणवीसांनी पवारांच्या टीकेला उत्तर दिले.

नागपूर – गोवा महामार्गाचे काम समृद्धीच्या धर्तीवर

एक्स्पोच्या समारोप प्रसंगी फडणवीस यांनी नव्या नागपूर – गोवा या महामार्गाची घोषणा केली. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर या रस्त्याचे काम केले जाणार आहे. हा महामार्ग मराठवाड्यासाठीही महत्त्वाचा असेल. नागपूर-गोवा महामार्ग असे नाव असले तरी मराठवाड्यातील तीन-चार जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार असून, इकॉनॉमिक कॉरिडोर असेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Back to top button