औरंगाबाद : माजी विद्यार्थ्याने घातला शिक्षिकेला गंडा | पुढारी

औरंगाबाद : माजी विद्यार्थ्याने घातला शिक्षिकेला गंडा

औरंगाबाद : माजी विद्यार्थ्याने शिक्षिकेला स्वस्तात आयफोन आणि लॅपटॉप मिळवून देण्याचे आमिष दाखवत 40 हजार 800 रुपयांचा गंडा घातला. ही घटना 4 ते 26 जून 2022 या दरम्यान गारखेडा परिसरातील अशोकनगरात असलेल्या यशदीप अपार्टमेंट येथे घडली. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून विद्यार्थ्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पृथ्वीराज सयाजी साळवे पाटील (रा.अलोकनगर, सातारा परिसर) असे गंडा घालणार्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. पृथ्वीराजने शिक्षिकेला फोन करून आपण बंगळुरू येथे कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारली. तसेच कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू 40 टक्के डिस्काउंटवर विकण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावेळी तक्रारदार शिक्षिकेने त्याला आयफोन- 12
आणि एक लॅपटॉप घ्यायचा असल्याचे सांगितले.

साळवेने शिक्षिकेकडून फोन व लॅपटॉपसाठी 40 हजार 800 रुपये घेतले. बरेच दिवस झाल्यानंतरही आयफोन आणि लॅपटॉप मिळत नसल्याने शिक्षिकेने त्याच्याकडे विचारणा केली. परंतु तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. आपली फसवणूक झाली असल्याचे
लक्षात येताच शिक्षिकेने या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून साळवेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button