दसरा विशेष : अनेक आजारांवर रामबाण औषधी आहेत आपट्याची पाने, जाणून घ्या महत्व | पुढारी

दसरा विशेष : अनेक आजारांवर रामबाण औषधी आहेत आपट्याची पाने, जाणून घ्या महत्व

पाचोड; मुक्तार शेख : दसरा हा उत्सव म्हणजे, चांगल्या प्रवृत्तींनी दृष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजयाचे प्रतीक आहे. हा सण आपट्याची पाने एकमेकांना देऊन साजरा केला जातो. परंतु, आपट्याची पाने ही वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असून ती कर्करोगासह अन्य आजारासाठी मनुष्यासाठी रामबाण औषध आहे. याबाबत जनजागृती करून आपट्याची वृक्षे वाचविण्याचे आवाहन वनप्रेमींनी केले आहे.

दसरा सण जवळ आला की, पूर्वी पाचोडसह लिंबगाव, थेरगाव, हर्षी, दादेगाव हजारे, मुरमा, कोळी बोडखा, वडजी, विहामांडवा, केकत जळगाव आदी ठिकाणी जंगलासह रानोरान नैसर्गिकरित्या उगवलेले आपट्याची झाडे ठिकठिकाणी असायचे. परंतु, वृक्षतोडीसोबत दसऱ्याला होणारी तोडणी ही झाडाला धोकादायक ठरुन असंख्य आपट्याची झाडे ही जळून नष्ट झाल्याचे दिसून येते. तसेच आपटा ही बोहिमियाच्या अनेक जातीपैकी भारतात सापडणारी एक वनस्पतींची जात आहे.  शेत तसेच डोंगराळ भागांमध्ये ही वनस्पती आढळते. परंतु, आज-काल वन्य प्राण्यांच्या भीतीने शेताच्या बांधावर असलेली दुर्मिळ आपट्यांची झाडे तोडली जात आहेत.

भारतीय संस्कृतमध्ये या वनस्पतीला वनराज म्हणजे, जंगलाचा राजा म्हणतात. या वनस्पतीला पांढऱ्या रंगाची छोटी फुले येतात म्हणून याला श्वेतकांचन असेही म्हणतात. परंतु, आपल्या जवळपास आढळणाऱ्या कांचन या वनस्पतीलाही आपटा समजले जाते. कारण या दोन्हीची पाने आकाराने सारखी आहेत व वृक्षही सारखाच दिसतो. पण कांचनची फुले जांभळी गुलाबी असतात. परंतु, दोन्ही वनस्पतीमध्ये बरेचसे साम्य असल्यामुळे आपटा समजून कांचनची पानेही मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. पिटा या वनस्पतीत अॅन्टीऑक्सिडेंट व जंतू विरुद्ध लढण्याचे गुणधर्म असतात. म्हणून ही वनस्पती जुलाब, अतिसार, अशा पोटाच्या विकारावर व इतर आजारावर, वापरतात.

याचबरोबर जुने जाणते नागरिक सांगतात की, कर्करोग या जीवघेण्या आजारामध्ये ट्युमर तयार होण्यास यामुळे प्रतिबंध होतो. तसेच कॅन्सरच्या सुरुवातीच्या अवस्थेत करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये आपटा ही वनस्पती मोलाचे ठरत असल्याने पूर्वीच्या काळात वापरली जात असे. आयुर्वेदामध्येही या वनस्पतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. फेब्रुवारी व मेदरम्यान याला फुले येतात, पण आपट्याची पाने देण्या- घेण्याच्या या प्रथेमुळे या जातीची जी अगदी थोडी झाडे उभी आहेत. त्यामुळे वृक्ष, पर्यावरणाबाबत शालेय विद्यार्थ्यांनाही पर्यावरण रक्षणाची जाणीव होणे गरजेचे आहे.

बाजारात आपट्याच्या हुबेहूब कांचन झाडाचे पाने विकतात

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने आपण सोने म्हणून वाटतो. त्यामुळे या झाडाची मोठ्या प्रमाणावर तोड होते. नवीन लागवडीच्या अभावामुळे जंगलातून ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपट्याचा तुटवडा भासत असल्यामुळे सध्या बाजारात आपट्याच्याच कुळातील “कांचन” नावाच्या वनस्पतीची पाने विकली जातात आणि अज्ञानापोटी बरीच मंडळी ही पाने विकत घेतात आणि खूप मोठी -मोठी सोन्याची पाने मिळाली म्हणून आनंदात असतात. ही दोन्ही पाने साधारण सारखी दिसत असली तरी त्यात बराच फरक आहे.

बहुगुणी आपटा वाचवायचा असेल तर या प्रथेसाठी एक पर्याय आहे. या आपट्याची पाने सोने म्हणून देण्याऐवजी आपण याची रोपे जर एकमेकाला देऊन दसरा सण साजरा करू शकलो. यामुळे या झाडांची कत्तल किंवा तोड कमी होईल. त्याच बरोबर आपटा व कांचन या झाडाचेही संवर्धन होईल.
– लतीफ सय्यदसर, शिक्षक पाचोड

हेही वाचलंत का? 

Back to top button