औरंगाबाद : अजिंठा परिसरात सोयाबीन सोंगणीचे दर वाढले

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : अजिंठा परिसरात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु होत असताना सोयाबीन सोंगणीच्या दरातही वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचशे रुपयांपर्यंत दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात आणखी भर पडली आहे. किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता असताना सोंगणीच्या दरातही वाढ होत असल्याने शेतकरी दुहेरी चिंतेत अडकला आहे.

सोयाबीनच्या काढणीला शेतकरी येत्या १५ दिवसांमध्ये सुरुवात करणार आहेत. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अनाड, बाळापूर, डिग्रस, गोळेगांव, धोत्रा, पिंपळदरी, सराटी, बोधवड या परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड झाली आहे. या परिसरात यांत्रिकीकरणाचा कमी वापर होत असल्याने पिकांची सोंगणी मजुरांकडून केली जाते. शेतकऱ्यांकडून सोयाबीन मजुरीची बोलणी सुरु झाली आहे. सोंगणीचा दर वेगवेगळ्या भागांत एकरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत निश्‍चित केला जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. एकाचवेळी सोयाबीन काढणीला आल्याने मजुरांची कमतरता भासू नये यासाठी शेतकरी जुळवाजुळव करत आहेत.

सोयाबीनचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. असे असताना सोयाबीन सोंगणी एकरी ३५०० ते ४००० रुपये मागितली जात आहे. मागील हंगामात आमच्या भागात हाच दर एकरी २७०० ते ३००० रुपये होता. यंदा पाचशे रुपये एकरी वाढ मागितली जात आहे. कशी तडजोड करावी हा प्रश्‍नच आहे.
– गणेश वामनराव घोडे, शेतकरी, पिंपळदरी

हेही वाचा :

Exit mobile version