औरंगाबाद : ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १३ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १३ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : सायकलवरून घरी येत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने एका १३ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बहिरगाव-डोणगाव रोडवरून शाळेतून सायकल वर घरी येत असताना श्रद्धा सोमिनाथ पिंपळे ही विद्यार्थिनी ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. दरम्यान, रुग्णालयात नेत आसताना तिचा मृत्यू झाला आहे. श्रद्धा पिंपळे ही डोणगाव वस्ती येथे राहत होती. ती बनशेद्रा येथील शाळेत दररोज सायकल वरून जात शिक्षण घेत होती. शाळा सुटल्याने सायकलवरून घरी परत येत असताना हा अपघात झाला.

बहिरगाव – डोणगाव रोडवर दोन्ही बाजूला एका व्यावसायिकाची जमीन असून जेसीबी व बारा ते पंधरा ट्रॅक्टरद्वारे उत्खनन करून रोडच्या दुसऱ्या बाजूला भराव टाकण्याचे काम सुरू आहे. येथे ट्रॅक्टर च्या वाहनांचा अक्षरशः धुडगूस सुरू होता. या प्रकरणी सोशल मीडियावर प्रसार माध्यम प्रतिनिधीनी प्रश्न ही उपस्थितीत केले होते. यंत्राने उत्खनन करण्याची परवानगी आहे का? असल्यास किती? आदी प्रश्न निर्माण झाले होते. मात्र याकडे तहसील प्रशासन, महामार्ग पोलीस, व आदी संबधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. या रोडवर बहिरगाव डोणगाव या गावाकडे जाणाऱ्या लोकांचे वर्दळ असते.

मात्र या ठिकाणी दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनांचा धुमाकूळ सुरू आसल्याने जीव मुठीत घेऊन लोकांचा प्रवास सुरु होता. अखेर एका शाळकरी मुलीला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी घटनास्थळी येऊन ट्रॅक्टर चालक यास अटक करून ट्रॅक्टर ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. तर शवविच्छेदन करण्यासाठी मुलीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button