
पिशोर (ता. कन्नड); पुढारी वृत्तसेवा : पुणे येथे हवालदार पदावर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल (गुरुवार) सकाळी निधन झाले. जवान सुनील जाधव (वय ३३) यांच्या निधनाची बातमी गावात पसरताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. पिशोर येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून सैनिकाप्रती आपली संवेदना व्यक्त केली.
पिशोर येथील सैनिक सुनिल दादाराव जाधव हे ऑक्टोबर २००८ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. आर्मीतील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर (पुणे) येथे हवालदार या पदावर कर्तव्यावर असताना सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थियावर आज (शुक्रवार) पिशोर येथील पिशोर ते कोळंबी रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुनिल यांनी देशातील अनेक ठिकाणी देश रक्षणाची आपली जबाबदारी पार पाडली होती. मागील अडीच वर्षांपासून ते पुणे येथे कर्तव्यावर होते. येथेच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एवढ्या तरुण वयात मनमिळावू स्वभावाच्या सैनिकाचे ह्रदयविकाराने अकाली निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सैनिक सुनील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
हेही वाचा :