
पैठण, पुढारी वृत्तसेवा : बालानगर (ता. पैठण ) येथील शेतकऱ्याच्या मुलाकडून दोन लाख रुपये लुबाडून एका तोतया मामाने लग्न लावून दिले होते. एक महिना होत आला तरीही या वऱ्हाड टोळीतील मंडळींना तपास अधिकाऱ्यांकडून अटक झाली नाही. यामुळे तपास गुलदस्त्यात ठेवला का काय, असे वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रकाशित झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी या वृत्ताची दखल घेऊन बनावट टोळीतील फरार झालेल्या तोतया मामा याला गजाआड केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बालानगर येथील शेतकरी नाना राणुजी गोंडे यांच्या मुलाचे दोन लाख रुपये घेवून लग्नाचा करार केला. काजळा (जि. जालना) येथील निकिता सखाराम गोळे हिचे लग्न झाले हाेते. तिला मुलगाही हाेता. तिचे मुलासोबत लग्न लावून दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरी व नातेवाईक तोतया असल्याचा प्रकार मुलाच्या लक्षात आला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून नवरीसह टोळीतील आरोपी शेख पाशा व गणेश शंकर गोडेकर रा. औरंगाबाद यासह पाच आरोपींवर गुन्हा दाखल झाला हाेता.
तोतयांवर गुन्हा दाखल होवून एक महिना उलटूनही अटक न झाल्यामुळे तक्रारदार मुलाने उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांची समक्ष भेट घेऊन आरोपीला अटक करण्यासंदर्भात निवेदन दिले. दरम्यान या बनावट लग्नाचा दैनिक पुढारीने पाठपुरावा केला . रविवारी (दि.२८) रोजी सायंकाळी तपास अधिकारी दशरथ बुरकूल, पो.ना.महेश माळी, मुकुंद नाईक, हर्षल वाघ यांनी या टोळीतील आरोपी शिवाजी भागाजी धनेधर (रा. क्रांतीनगर रामनगर औरंगाबाद) अटक केली. यापूर्वी तीन आरोपीवर कारवाई झालेली असून एका आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
हेही वाचलंत का ?