औरंगाबाद : नाथसागर धरणाचे १८ दरवाजे बंद | पुढारी

औरंगाबाद : नाथसागर धरणाचे १८ दरवाजे बंद

पैठण; पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्याच्या सिंचन व औद्योगिक नगरीला वरदान ठरलेले पैठण येथील नाथसागर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर वरील धरणातून सुरू असलेली पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाचे १८ दरवाजे आज (दि.२६) बंद करण्यात आले. जून महिन्यापासून पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाने नाथसागर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यासाठी २७ पैकी १८ दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, वरील धरणातून पाण्याची आवक सुरू झाल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी योग्य नियोजन केले होते. धरणाची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गोदावरी नदीत विसर्ग सुरू ठेवला होता. आठवड्यापूर्वी आवक वाढल्यामुळे जवळपास ७६ हजारपर्यंत विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती. गोदावरी नदीत असलेले राक्षस भवन येथील शनी मंदिर पूर्णतः पाण्यात बुडाले होते.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे धरणाचे उघडलेले १८ दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. धरणात एकूण पाणीसाठा १५२१.४३ फूट आहे. जिवंत पाणीसाठा २१०२. ८७१ दलघमी असून पाण्याची टक्केवारी ९६.८६ इतकी दुपारी दोनपर्यंत नोंद झाली होती. तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती ‘दैनिक पुढारी’शी बोलताना कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. पाण्याची आवक वाढल्यास बंद करण्यात आलेले धरणाचे दरवाजे काही प्रमाणावर पुन्हा उघडले जातीत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button