टोमॅटो मातीमोल : शेतकऱ्याने साडेतीनशे कॅरेट टोमॅटो फेकला रस्‍त्‍यावर | पुढारी

टोमॅटो मातीमोल : शेतकऱ्याने साडेतीनशे कॅरेट टोमॅटो फेकला रस्‍त्‍यावर

बिडकीन; पुढारी वृत्‍तसेवा : टोमॅटो मातीमोल भाव : दिवस-रात्र एक करून पिकवलेल्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने बिडकीन जवळील पाडळीच्या शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शनिवारी ( ता.२८ ) रोजी जगन्नाथ हुड यांनी शेतातून काढलेला टोमॅटो बिडकीन-पोरगाव रोडवर आणून फेकला.

टोमॅटो मातीमोल भाव

पाडळी येथील शेतकरी जगन्नाथ हुड यांनी आपल्या दोन एकर शेतात यावर्षी टोमॅटोची लागवड केली होती. यासाठी त्यांना अंदाजे दोन लाख रुपयांचा खर्च आला.

स्व:ताकडे पैसे नसल्याने त्यांनी गावातील काही लोकांकडून उधारीवर पैसे घेऊन पिकांना खत-पाणी वेळेवर केले. तसेच दोन पैसे मिळतील म्हणून प्रचंड कष्ट करत पिकांना जगवलं. टोमॅटो तोडणीसाठी आले असता पहिल्याचा वेळा तब्बल साडेतीनशे कॅरेट टोमॅटो निघाले.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन झाल्याने मोठ्या अपेक्षाने हूड टोमॅटो घेऊन बाजारात विकण्यासाठी गेले. मात्र यावेळी टोमॅटोचा दर एकूण त्यांच्या पाया खालची वाळू सरकली.

कवडीमोल भावाने व्यापारी टोमॅटो विकत घेत असल्याने त्यानी टोमॅटो पुन्हा घरी परत आणला. पण कुठच भाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या हूड यांनी आपला माल अक्षरशः रस्तावर फेकून दिला.

टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्याने या वर्षाची शेती न परवडणारी ठरली. एवढच नाही तर त्यासाठी घेतलेलं कर्ज सुद्धा फेडणे अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारने काही तरी मदत करून किमान लावणीसाठी आलेला खर्च निघेल याची व्यवस्था करावी.
-जगन्नाथ हुड, शेतकरी

Back to top button