औरंगाबाद : पाणी तपासणीकडे वाढला कल | पुढारी

औरंगाबाद : पाणी तपासणीकडे वाढला कल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा :  पिण्यासाठी, तसेच शेतीच्या सिंचनासाठी वापरले जाणारे पाणी कितपत उपयुक्‍त आहे, त्यात घातक
द्रव्ये मिसळली आहेत काय, याची तपासणी करण्याकडे नागरिक, शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. जलसंपदा विभागाच्या गारखेडा
येथील जलविज्ञान प्रयोगशाळेत गेल्या आर्थिक वर्षात 589 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

जलसंपदा विभागाच्या जलविज्ञान प्रयोगशाळेत पाणीनमुने तपासणीसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली असून, वैशाली पवार या मुख्य रसायन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. जलसंपदा विभागातील कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येमुळे ही प्रयोगशाळा बंद करण्याची वेळ आली होती, परंतु राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्‍तीस परवानगी दिल्याने प्रयोगशाळा सुरू आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या प्रयोगशाळेत 689 पाणीनमुने तपासण्यात आले. त्यातून सव्वासहा लाख रुपयांचा महसूल मिळाला. या महसुलातूनच कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन दिले जाते, अशी माहिती उपविभागीय अभियंता सी. बी. कुलकर्णी, शाखा अभियंता एम. ए. खवले यांनी दिली.

55 निकषांची तपासणी :  या प्रयोगशाळेत पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची विविध 55 निकषांच्या आधारे तपासणी केली जाते.
औद्योगिक पाणीनमुनेही तपासणीसाठी येत असतात, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Back to top button