औरंगाबाद : जिल्ह्यात अडीच लाख राष्ट्रध्वजांची खरेदी | पुढारी

औरंगाबाद : जिल्ह्यात अडीच लाख राष्ट्रध्वजांची खरेदी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना आतापर्यंत प्राप्त झालेल्या 3 लाख 10 हजार 929 पैकी 40 हजार 58 ध्वज निकृष्ट निघाले असून, ते कंत्राटदारास परत केले आहेत, तर प्रशासनामार्फत नागरिकांनी 2 लाख 40 हजार 217 ध्वज गुरुवारी सायंकाळपर्यंत खरेदी करून नेले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांनी दिली.

हर घर तिरंगा उपक्रमास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने या मोहिमेसाठी विविध शासकीय कार्यालयांत ध्वज विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. ग्रामीणच्या 9 तालुक्यांतील घरांची संख्या ही 3 लाख 92 हजार 350 एवढी आहे. त्यासाठी प्रशासनाने तेवढ्याच ध्वजखरेदीची निविदा प्रक्रिया राबवून, कंत्राटदार नियुक्‍त केला. या कंत्राटदार एजन्सीने 3 लाख 10 हजार 929 ध्वजांचा पुरवठा
जिल्हा परिषदेला केला आहे, परंतु त्यांतील 40 हजार 58 ध्वज निकृष्ट निघाल्याने ते बदलून देण्यासाठी कंत्राटदाराला परत केले आहेत. तर तीन तालुक्यांना मागणीच्या 4 हजार 626 ध्वज कमी प्राप्त झाले आहेत. हे ध्वज तातडीने पुरविण्यात यावेत, अशी तंबी प्रशासनाने कंत्राटदार एजन्सीला दिली आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती कार्यालयांत ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ग्रामीण भागाला प्राप्त झालेल्या 2 लाख 70 हजार 871 पैकी 2 लाख 40 हजार 217 ध्वज नागरिकांनी खरेदी करून नेले असल्याची माहिती भोकरे यांनी दिली आहे. 15 हजार ध्वज दिले बदलून कंत्राटदार एजन्सीने पुरविलेल्या 3 लाख 10 हजार 929 पैकी 40 हजार 58 ध्वज निकृष्ट निघाले. ते सर्व प्रशासनाने परत केले असून, तातडीने बदलून देण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु त्यांपैकी आतापर्यंत केवळ 15 हजार 483 ध्वजच बदलून देण्यात आले आहे. आणखी 24 हजार 575 ध्वज प्राप्त होणे बाकी आहे.

43 ग्रा. पं. ध्वजाच्या प्रतीक्षेत

जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना सहज ध्वज उपलब्ध व्हावेत, यासाठी ग्रामपंचायतींना ध्वज पुरविले आहेत. या ग्रामपंचायतींमार्फत ते नागरिकांना विक्री करण्यात येत आहेत, परंतु अजूनही जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींना एकही ध्वज प्राप्त झालेला नाही. यात औरंगाबाद तालु्क्यातील 27, कन्नड- 6, वैजापूर- 4, तर फुलंब—ीतील 6 ग्रामपंचायती आहेत

Back to top button