औरंगाबाद : वर्‍हाडी म्हणून आले अन् बॅण्ड वाजवून गेले! | पुढारी

औरंगाबाद : वर्‍हाडी म्हणून आले अन् बॅण्ड वाजवून गेले!

जालना; पुढारी वृत्तसेवा : आयकर विभागाने जालना येथील स्टील उद्योजकावर ‘जरा हटके’ पद्धतीने कारवाई केली. ‘दूल्हन हम ले जायेंगे’ असे स्टिकरही वाहनावर लावून आयकर विभागाचे पथक जालन्यात वर्‍हाडी बनून आले अन् स्टील उद्योगजकांचा बॅन्ड वाजवून गेले.

जालन्यात चार स्टील उद्योगांसह औरंगाबाद येथील एक विकसक आणि एका व्यावसायिकावर आयकर विभागाने छापा टाकला. या छाप्यात तब्बल 58 कोटींच्या रोख रकमेसह 32 किलो सोने, 16 कोटींचे हिर्‍याचे दागिने अशी 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली.

शहरातील नवीन औद्योगिक वसाहतीतील स्टील उद्योगांवर गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या छाप्यात आयकरच्या नाशिक आणि
स्थानिक पथकातील तब्बल दोनशेपेक्षा अधिक अधिकारी सहभागी झाले होते. छाप्यात पकडण्यात आलेली बेहिशेबी रोख रक्‍कम मोजण्यासाठीच तब्बल 13 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 12 मशिन रोख रक्‍कम मोजण्यासाठी वापरण्यात
आल्या होत्या.

आयकर अधिकार्‍यांनी वर्‍हाडाच्या गाड्यांमधून येऊन ही छापेमारी केली. या वाहनांवर ‘दूल्हन हम ले जायेंगे’ अशा स्वरूपाचे स्टिकरही लावण्यात आले होते.प्रारंभी या छापेमारीमध्ये सुरुवातीला कुठेच रोकड आणि बेनामी रक्‍कम आढळून आली नव्हती, मात्र संबंधित व्यावसायिकाच्या फार्महाऊसवर छापा टाकला. तिथे कपाटाखाली, बिछान्यांमध्ये रोख रक्‍कम आढळून आल्याची माहिती समोर आली. अडगळीतील काही पिशव्यांमध्येही रोकड सापडल्याचे कळते. मोठ्या प्रमाणात नोटा आढळून आल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले होते.

1 ऑगस्टला सुरू करण्यात आलेल्या या छापेमारीबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. 8 ऑगस्टपर्यंत आयकरचे अधिकारी तपास करत होते. नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचाही या कारवाईत सहभाग होता. अडीचशेपेक्षा जास्त अधिकारी 120 हून अधिक वाहनांमधून जालन्यात आले होते. जालन्यात आढळून आलेली रोख रक्‍कम स्थानिक स्टेट बँकेत नेण्यात आली. तिथे सकाळी 11 वाजता या रोख रकमेची मोजणी सुरू करण्यात आली होती. ही मोजणी 14 तासांनी म्हणजे मध्यरात्री एक वाजता पूर्ण झाली.

Back to top button