टीईटी घोटाळेबाजांच्या यादीत अब्दुल सत्तार यांची चार अपत्ये | पुढारी

टीईटी घोटाळेबाजांच्या यादीत अब्दुल सत्तार यांची चार अपत्ये

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काळ्या यादीत टाकलेल्या राज्यातील 7 हजार 784 परीक्षार्थींमध्ये सिल्‍लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली व एका मुलाचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. या परीक्षार्थींची टीईटी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून परीक्षा देण्यास कायमस्वरूपी बंदी घातली आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने आ. सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिवसेनेशी बंडखोरी करून आ. सत्तार हे शिंदे गटात सामील झाले. मविआ सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेल्या सत्तार यांचा शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात समावेश निश्‍चित मानला जात होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांच्या मुलांची नावे टीईटी परीक्षेत गैरप्रकार करणार्‍यांच्या यादीत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आ. सत्तार अडचणीत आले आहेत. 2019 च्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या सात हजार 874 परीक्षार्थींची नावे राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली आहेत. अपात्र असतानाही गुणांत फेरफार करून अंतिम निकालात पात्र ठरविण्यात आल्याचा ठपका या परीक्षार्थींवर ठेवण्यात आला आहे. या यादीत आ. सत्तार यांच्या मुली हिना कौसर अब्दुल सत्तार शेख, उजमा नहीद अब्दुल सत्तार शेख, हुमा फरहिन अब्दुल सत्तार आणि मुलगा मोहम्मद आमेर सत्तार शेख यांच्या नावांचा समावेश आहे.

सत्तारांच्या नापास मुलांची प्रमाणपत्रे व्हायरल

टीईटी परीक्षेचा निकाल 19 जानेवारी 2020 रोजी जाहीर झाला होता. त्यात उजमा सत्तार यांना 33.09 टक्के, तर हिना कौसर यांना 25.17 टक्के गुण मिळाले. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 55 टक्के गुण गरजेचे असताना दोघींना उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले. परीक्षा परिषदेनेनंतर उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. या प्रकरणाचा ईडीकडूनही तपास सुरू आहे. आ. सत्तार यांच्या मुलींची अनुत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

सत्तारांचे एकेक प्रकरण बाहेर काढणार
टीईटी घोटाळ्याची चौकशी खूप आधीपासून सुरू होती. ती सिल्‍लोडपर्यंत पोहोचली. त्यावर सरकारने निर्णय घ्यावा. सत्तार यांची खूप प्रकरणे आहेत. त्यांची काही प्रकरणे माझ्याकडे आलेली आहेत. एकेक करून मी ती बाहेर काढणार आहे. काही प्रकरणे कोर्टात सुरू आहेत. एका प्रकरणात हायकोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत.
– चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते

Back to top button