Dowry : पाच लाखांच्या हुंड्यासाठी नायब तहसीलदाराची पत्नीला मारहाण | पुढारी

Dowry : पाच लाखांच्या हुंड्यासाठी नायब तहसीलदाराची पत्नीला मारहाण

पैठण; पुढारी वृत्तसेवा: दवाखाना सुरू करण्याच्या नावाखाली माहेरून ५ लाख रुपये न आणल्यामुळे (Dowry) शारीरिक व मानसिक त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेतला. तसेच मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याप्रकरणी कीर्ती देवेंद्र कुऱ्हे (रा. गोविंदनगर, येवला जि. नाशिक) या महिलेने आज (दि.२९) पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार बुलढाणा येथे नायब तहसिलदार पदावर कार्यरत असणारे पीडित महिलेचे पती देवेंद्र संतोष कुऱ्हे यांच्यासह चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार महिला कीर्ती देवेंद्र कुऱ्हे या महिलेचे लग्न दि. २४ डिसेंबर २०२० रोजी हिंदू रीती रिवाजाने सुरुवातीला विक्रीकर निरीक्षक असलेले देवेंद्रसोबत कोपरगाव येथे झाले होते. यावेळी कीर्तीच्या माहेरच्याकडून ५ लाख व १० तोळे सोन्याच्या दागिने(Dowry) दिले होते. त्यानंतर कीर्ती  पतीच्या नोकरीच्या गावी येवला येथे राहत होते. त्यानंतर पती देवेंद्र यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाल्यानंतर ती बुलढाणा येथे राहत होती.

दरम्यान, माहेरच्या मंडळीने लग्नात सर्व मानपान देऊन संसारोपयोगी वस्तू देऊनही नवीन दवाखाना सुरू करण्यासाठी माहेरवरून ५ लाख रुपये आणण्यासाठी कीर्तीकडे तगादा लावला होता. ही मागणी मान्य न केल्याने पती नायब तहसीलदार देवेंद्र, सासू कल्पना, सासरा संतोष लक्ष्मण कुऱ्हे, दीर रोहित ऋषिकेश चारित्र्याचा संशय घेऊन कीर्तीला मारहाण करू लागले. तसेच तिला घराबाहेर हाकलून दिले.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस जमादार गोपाल पाटील यांनी नायब तहसीलदारसह सासू-सासरा, दीर या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती लहाने करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button