औरंगाबाद : आडूळ येथे चोरट्यांचे आधी देवाचे दर्शन; मग दानपेटीवर डल्ला | पुढारी

औरंगाबाद : आडूळ येथे चोरट्यांचे आधी देवाचे दर्शन; मग दानपेटीवर डल्ला

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात चोरट्यांनी जैन मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ४ लाख रुपये लांबविल्याची घटना पैठण तालुक्यातील आडूळ येथे मंगळवारी (दि.१३) मध्यरात्री घडली.  या प्रकरणी पाचोड (ता. पैठण) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान चोरट्यांनी आधी देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे या आधीसुध्दा २०१६ व २०१८ मध्ये याच मंदिरातील भगवंताच्या दोन मूर्त्या व घंटा चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आडूळ येथील महावीर चौकाजवळ  असणाऱ्या  जैन मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना  बुधवारी (दि.१३) पहाटे भाविक दर्शनासाठी आल्यानंतर  उघडकीस आली. चोरट्यांनी मंदिराच्या समोरील मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून अंदाजे चार लाखांच्या नोटा गोण्यामध्ये भरून लंपास केल्या.

या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना कळविली. यानतंर सहाय्यक पोलीस निरीक्षक  गणेश सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सूतळे, बीट जमादार जगन्नाथ उबाळे, रविंद्र क्षीरसागर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मंदिर परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, स्थानिक गुन्हे शाखेचे  श्रीमंत भालेराव यांनी भेट दिली. घटनास्थळी ठसे तंज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, वारंवार अशा चोरीच्या घटना याच मंदिरात घडत असल्याने जैन बांधवांनी निषेध व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे चोरी करताना चोरांनी भगवंताचे प्रथम व बाहेर जाताना दर्शन घेतले. परंतु इतर सोन्याचांदीच्या दागिन्यांना आणि वस्तुंना हात लावला नाही. फक्त दानपेटीतील रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

Back to top button