औरंगाबाद : शेवटचा प्रश्नच प्रश्नपत्रिकेतून गायब | पुढारी

औरंगाबाद : शेवटचा प्रश्नच प्रश्नपत्रिकेतून गायब

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : 1 जुलैपासून पदव्युत्तर परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठाकडून घेण्यात येत असलेल्या परीक्षेदरम्यान गोंधळ होणे हे समीकरण ठरलेले आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या एमबीएच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत चक्‍क एक प्रश्नच छापून आला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न चुकून राहून गेल्याने पेपर संपायला वीस मिनिटे बाकी असताना महाविद्यालयांना फोन करत शेवटचा प्रश्न फळ्यावर लिहून देण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले. जे विद्यार्थी पेपर सोडवून गेले होते, त्यांचा शेवटचा प्रश्न सोडवणे राहून गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून सध्या पदव्युत्तरच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा 1 जुलैपासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी (दि. 6) एमबीएच्या   प्रथम वर्षातील द्वितीय सत्रातील सातवा पेपर हा इंडियन इथिक अँड व्हॅल्युज या विषयाचा 40 गुणांचा दोन तासांचा पेपर होता. त्यातील ‘पार्ट बी’मध्ये प्रत्येकी 15 गुणांचे तीन प्रश्न देण्यात आले होते. त्यांपैकी दोन प्रश्न सोडवा असे सांगण्यात आले होते, मात्र नियमानुसार ‘पार्ट बी’मध्ये दहा – दहा गुणांचे चार प्रश्न देणे आवश्यक आहे, त्यातील तीन प्रश्न सोडविणे गरजेचे असते, मात्र एक प्रश्न देण्यातच आला नसल्याने काही विद्यार्थी तीनपैकी दोन प्रश्न सोडवून दीतासातच निघून गेले. शेवटच्या वीस मिनिटांत विद्यापीठ प्रशासनाकडून प्रश्नाबाबत झालेल्या चुकीविषयक महाविद्यालयांना कळविण्यात आले व शेवटचा प्रश्न फळ्यावर लिहून देण्याच्या सुचना देण्यात आल्या, मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थी निघून गेलेले असल्याने त्यांचा शेवटचा प्रश्न सोडविणे राहून गेले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठप्रशासनाला निवेदनही दिले आहे.

Back to top button