औरंगाबाद : प्लास्टिकचा कचरा 10 रुपये किलोने घेणार | पुढारी

औरंगाबाद : प्लास्टिकचा कचरा 10 रुपये किलोने घेणार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणाला हानिकारक ठरणार्‍या प्लास्टिक कचर्‍याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी, गाव प्लास्टिक कचरामुक्‍त करण्यासाठी ग्रामपंचायतीही पावले उचलू लागल्या आहेत. जिल्ह्यातील पाटोदा आणि पिंपळदरी या ग्रामपंचायतींनी प्लास्टिकचा कचरा 10 रुपये किलो दराने खरेदी करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  प्लास्टिकचा कचरा हा जगासमोरील एक मोठे आव्हान बनलेला आहे. या कचर्‍याचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने, प्लास्टिकचा कचरा गोळा करून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध स्तरांवर कार्यवाही होऊ लागली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन-टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील हागणदारीमुक्‍त झालेल्या ग्रामपंचायतींना हा निधी दिला जात आहे. घनकचरा व सांडपाणी गोळा करून, त्याचे विकेंद्रीकरण करणे, प्रक्रिया करणे, शास्त्रोक्‍त पद्धतीने व्यवस्थापन करूनत्याची विल्हेवाट लावणे यासाठी हा निधी दिला जात आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील 626 गावांची या योजनेसाठी निवड झाली आहे, तर यापूर्वी 144 गावांची निवड झाली आहे.

 

गावातील घराघरामध्ये निर्माण होणारा प्लास्टिक कचरा नागरिकांनी जमा करावा. हा कचरा ग्रामपंचायत त्यांच्याकडून 10 रुपये किलो दराने विकत घेईल. त्यामुळे ग्रामस्थांना प्लास्टिकचा कचरा स्वतंत्रपणे जमा करण्याची सवय लागेल. गावात इतरत्र हा कचरा पसरणार नाही, या उद्देशाने ग्रामपंचायती अभिनव उपक्रम राबवीत आहेत. औरंगाबादेतील पाटोदा आणि अजिंठ्याजवळील पिंपळदरी या ग्रामपंचायतींनी हा उपक्रम सुरू केला आहे.
– नीलेश गटणे, सीईओ, जि.प.

Back to top button