औरंगाबाद : सराफा व्यावसायिकाला मारहाण, चांदीच्या दागिन्यांची बॅग लांबविली | पुढारी

औरंगाबाद : सराफा व्यावसायिकाला मारहाण, चांदीच्या दागिन्यांची बॅग लांबविली

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : एका दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी चांदीच्या दागिन्यांची विक्री करणार्‍या सराफा व्यावसायिक व त्यांच्या मित्रास मारहाण करून चांदीचे दागिने व रोख रक्‍कम अशी 2 लाख 14 हजार 500 रुपये ऐवज असलेली बॅग बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी दुपारी आसेगाव- माळीवाडा रस्त्यावर घडली.

या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साहेबराव घाडगे ( 38 रा. दत्त मंदिराजवळ, फुलंबी) हे सोन्या-चांदीच्या दुकानदारांना होलसेल दरात चांदीच्या दागिन्यांची विक्री करतात. आसेगाव येथील दुकानदाराने दागिन्यांची मागणी केल्याने नितीन घाडगे व त्यांचा मित्र निलेश थोरात हे 3 जुलैरोजी साडे तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून दागिने घेऊन आसेगाव येथे आले होते. याठिकाणी त्यांनी पवार नावाच्या दुकानदारास दीडशे ग्रॅम वजनाच्या चांदीच्या आंगठ्या देऊन त्याच्याकडून साडेचार हजार रुपये घेतले. त्यानंतर दागिन्यांची बॅग दोघांच्यामध्ये ठेवून ते दुचाकीवरून औरंगाबादकडे जाण्यासाठी माळीवाडा रस्त्याने निघाले होते.

आसेगाव पासून दीड कि.मी. अंतरावर असलेल्या पुलाजवळ पाठीमागून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा अनोळखी भामट्यांपैकी एकाने घाडगे यांची दागिन्यांची बॅग हिसकावून घेतली. यांचा मित्र निलेश हा दुचाकीवरून खाली पडला. तिघे भामटे दागिन्यांची बॅग घेऊन पसार होत असतांना घाडगे यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करून भामट्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धक्‍का देऊन दागिन्यांची बॅग त्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीवरील तिघा भामट्यापैकी पाठीमागे बसलेल्याने घाडगे यांच्या डोक्यात लोखंडासारखी वस्तू मारून त्यांना दुचाकीवरून खाली पाडले. नंतर भामटे दुचाकीवरून माळीवाड्याच्या दिशेने पसार झाले. दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button