औरंगाबाद : पळसवाडीत घरफोडीच्या घटनांत दीड लाखाचा मुद्देमाल लंपास | पुढारी

औरंगाबाद : पळसवाडीत घरफोडीच्या घटनांत दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पळसवाडी येथे गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री चार घरे फोडून चोरट्यांनी एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर शहरातील हॉटेल ग्रीनपार्कजवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरींच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

चांगदेव आसाराम म्हसरुप हे कुटुंबासह पळसवाडी शिवारातील गटक्रमांक 70 मधील शेतात राहतात. दरवाजा तोडून सहा चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून म्हसरुप कुटुंबातील सर्वाना एक तास ओलीस ठेवण्यात आले.

तसेच घरातील महेश म्हसरुप व भगवान म्हसरुप यांचे मोबाईल घराबाहेर फेकून दिले. त्यामुळे त्यांना कुणाशी संपर्क करता आला नाही. चोरट्यांनी घरातील रोख तीस हजार रुपये व एक लाख वीस हजारांचे दागिने असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी शेतीच्या कामासाठी तीस हजार रुपयांचा कांदा विकला होता.

चोरट्यांनी दुसरी घरफोडी शेख नईम यांच्या घरी केली. शेख कुटुंब जागी झाल्यामुळे चोरट्यांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. शेख कुटुंबानी प्रतिउत्तर दिल्यामुळे चोरटे पळून गेले. पुढील तपास पोलिस निरीक्षक भुजंग हातमोड, पोलिस कर्मचारी नवनाथ कोल्हे, सुदाम साबळे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button