औरंगाबाद : गांजा विकणारी महिला अन् पुरवठादारांचा पर्दाफाश | पुढारी

औरंगाबाद : गांजा विकणारी महिला अन् पुरवठादारांचा पर्दाफाश

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : नशेखोरांविरुद्ध शहर पोलिसांची जोरदार मोहीम सुरू आहे. बटन गोळ्यांसह अंमली पदार्थ विक्री करणार्‍यांची धरपकड केली जात आहे. एनडीपीएस पथकाने चिकलठाण्यात गांजा विक्री करणार्‍या महिलेला पकडत तिला गांजा पुरवठा करणार्‍या दोघांचा पर्दाफाश केला. त्यातील एकाला पकडले तर दुसरा पळून गेला. त्यांच्याकडून सहा किलो 652 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. 1 जुलैला चिकलठाण्यात ही कारवाई केली.

विजय दिनकर जाधव (25, रा. गल्ली क्र. 10, मिसारवाडी) आणि राधाबाई अंबादास माळवे (रा. दुर्गा कॉलनी, चिकलठाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर, अशोक भालेराव (रा. मिसारवाडी) हा पसार झाला आहे. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले, एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद, सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, हवालदार सय्यद शकील, अंमलदार धर्मराज गायकवाड, प्रकाश गायकवाड, आनंद वाहूळ, महिला अंमलदार प्राजक्ता वाघमारे, चालक दत्ता दुभाळकर हे एमआयडीसी सिडको ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यांना दुर्गा कॉलनीतील एक महिला गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेचच सापळा लावला. त्या महिलेला गांजा देण्यासाठी आलेल्या विजय जाधवला पकडले. त्याच्याकडून दोन किला 45 ग्रॅम गांजा जप्त केला. त्याने महिलेला दिलेला 6 किलो 606 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. एकूण 92 हजार 114 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्यावर महिलेला गांजा पुरविणाया अशोक भालेरावचे नाव समोर आले. पथक त्याला शोधण्यासाठी गेले असता तो पसार झाला.

Back to top button