पैठण :वारकर्‍यांसाठी प्रत्येक घरातून जमा केली जाते तीन किलो भाकरी | पुढारी

पैठण :वारकर्‍यांसाठी प्रत्येक घरातून जमा केली जाते तीन किलो भाकरी

पैठण : पुढारी वृत्तसेवा : संत एकनाथ महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी पायीवारीसाठी दररोज वेगवेगळ्या गावात दाखल होत आहे. दांडेगाव (ता. भूम, जि. उस्मानाबाद (धाराशिव) पंचक्रोशीतील नागरिकांनी पालखी सोहळ्याचे जल्‍लोषात स्वागत करण्यात आले. दांडेगावच्या प्रत्येक घरातून तीन किलो भाकरी जमा करीत वजन काट्यावर मोजून एकत्रित करीत वारकर्‍यांची भोजन व्यवस्था करण्याची वर्षानुवर्षांपासूनची अनोखी परंपरा ग्रामस्थांनी यंदाही जपून वारकर्‍यांचे आदरातिथ्य केले.

संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याने 20 जून रोजी संताची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणनगरीतून प्रस्थान ठेवले. पालखी सोहळा शुक्रवारी (दि. 1) उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील दांडेगावात मुक्‍कामासाठी दाखल झाला. सोहळ्याच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे यंदाही सुमारे 25 हजारांहून अधिक वारकरी नित्यनियमाने गावात दाखल झाले.

वारकर्‍यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था गावकरी मोठ्या उत्साहाने करतात. तीन हजार लोक वस्ती असलेल्या गावातील प्रत्येक घरातून तीन किलोच्या बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसह गव्हाच्या पोळ्या जमा केल्या जातात. वजन काट्यावर भाकरींचे वजन करीत गावातील प्रमुख व्यक्‍ती, भजन मंडळी, सरपंच शाळांमध्ये एकत्रित करीत वारकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. लोकवर्गणीतून सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बाजार आमटी व भाकरीच्या मेजवानीचा आस्वाद वारकरी घेतात. तर पांडुरंगाच्या भेटीला जाणार्‍या वारकर्‍यांना पोटभर जेऊ घालून दांडेगावकर तृप्त होतात. तसेच वाजतगाजत पालखी सोहळा पुढील गावाकडे मार्गस्थ करण्याची अनोखी परंपरा या गावातील नागरिक वर्षानुवर्षांपासून जोपासत आहे.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्ष संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे निर्बंधामुळे दांडेगाव परिसरात आगमन झाले नव्हते. यंदा पालखी सोहळ्यात दुप्पट वारकरी सहभागी झाल्यामुळे यंदा गावातील प्रत्येक घरामधून दोनऐवजी तीन किलो भाकरी जमा करण्यात आली.
– पांडुरंग भोगील, ग्रामस्थ

Back to top button