औरंगाबाद : जिल्हा बँकेवरील सत्ता शिवसेना गमावणार | पुढारी

औरंगाबाद : जिल्हा बँकेवरील सत्ता शिवसेना गमावणार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तांतराचे परिणाम औरंगाबाद जिल्हा बँकेवरही होणार आहेत. काँग्रेस, भाजप व शिवसेना असा प्रवास करणारे बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे लवकरच आपल्या समर्थक संचालकांसह शिवसेना बंडखोर मंत्र्यांच्या तंबूत दाखल होणार आहेत.

जिल्हा बँकेची गेल्या वर्षी मार्च महिन्यात निवडणूक झाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते आ. हरिभाऊ बागडे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे,
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने निवडणुकीत बाजी मारली होती, परंतु आ. बागडे यांना पराभव पत्कारावा लागला होता. निवडणुकीनंतर भाजपमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी तत्कालीन मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. नितीन पाटील हे काँग्रेसचे माजी आमदार राहिले आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे ते समर्थक असून, सत्तारांमुळेच त्यांना जिल्हा बँक अध्यक्षपदाची खुर्ची मिळाली होती. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. सत्तार यांचे समर्थक अर्जुन गाढे हे बँकेचे उपाध्यक्ष आहेत. आता भुमरे, सत्तार यांनी शिवसेनेविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविल्याने नितीन पाटील हे आपले समर्थक संचालक मनोज राठोड, डॉ. सतीश गायकवाड, जावेद पटेल यांच्यासह शिवसेनेचा त्याग करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण हे दोनच संचालक महाविकास आघाडीचे ठरणार आहेत. शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपजिल्हा प्रमुख कृष्णा डोणगावकर हेदेखील बँकेचे संचालक आहेत. ते काय भूमिका घेतात, याबद्दल उत्सुकता आहे.

संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे औरंगाबादेत परतल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होईल. त्यावेळी मी आपली भूमिका स्पष्ट
करणार आहे.
– नितीन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक.

Back to top button