औरंगाबाद : पाचोडकरांना संदिपान भुमरे यांच्या मंत्रिपदाचे वेध | पुढारी

औरंगाबाद : पाचोडकरांना संदिपान भुमरे यांच्या मंत्रिपदाचे वेध

पाचोड ; मुक्तार शेख : राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थक आमदारांना सुखद धक्का बसला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नव्या सत्तेत पैठण तालुक्याला मंत्रिमंडळात झुकते माप मिळण्याची दाट शक्यता आहे. माजी रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा जोरकसपणे सुरू आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटात सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून  संदिपान भुमरे यांच्याकडे बघितले जात आहे. वजनदार खात्यासह औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची चर्चा तालुक्यासह भुमरे यांचे मूळगाव असलेल्या पाचोडमध्ये सुरू झाली आहे. राज्यातील राजकारणाने घेतलेले नवे वळण पाहता तालुक्यातील राजकीय समीकरणेही नेमके कोणते वळण घेतात, याकडे लक्ष लागून आहे. एरव्ही बंडखोर एकनाथ शिंदे गट की शिवसेना अशी ‘तळ्यात मळ्यात’ भूमिका असलेले नेते व काही पदाधिकाऱ्यांचीही भाजपच्या खेळीमुळे गोची झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

राजकारणात कधी काय होईल हे कधीच निश्चित नसते. कालपर्यंत सत्तेत असणारे  आज विरोधात आणि विरोधात असणारे सत्तेवर, असे चित्र बरेचदा लोकांनी अनुभवले आहे. शिवसेनेतील बंडामुळे सध्या तसेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. परंतु, याचे पडसाद तालुक्यात फारसे उमटू लागल्याचे दिसत नाही. तालुक्यात भुमरे सेनाच मजबूत असल्याचे दिसते.

नव्या समीकरणाचा फायदा कोणाला ?

राज्यातील राजकीय भूकंपाचे पडसाद  पैठण तालुक्यात म्हणावे, तसे  काहीच  उमटू शकले  नाहीत. शिंदे सरकार आल्याने  राजकारणात अनेक बदल होण्याची चिन्हे आहेत. भाजप सत्तेत आल्याने त्यांच्याही  कार्यकर्त्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. सध्याच्या राजकारणामुळे आगामी निवडणुकांमध्ये नेमका कोणाला फायदा होणार, याची गणितेदेखील मांडली जात आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदेसेना असे पडसाद राज्यात उमटत असले, तरी पैठण तालुक्यातील शिवसैनिक संदिपान भुमरेंच्या पाठिशी ठामपणे असल्याचे एकंदरीत राजकीय परिस्थितीवरुन दिसून येते.

पैठण तालुक्याने आतापर्यंत दोन राज्यमंत्री, एक कँबिनेटमंत्रीपद भूषविले

महाराष्ट्र राज्यनिर्मितीपासून आजपर्यंत पैठण तालुक्याच्या वाट्याला आतापर्यंत दोन राज्यमंत्रीपदे आणि  एक कॅबिनेट मंत्रिपद वाट्याला आले आहे. तालुक्याला पहिले गृह राज्यमंत्री होण्याचा मान कै. कल्याण पाटील शिसोदे यांना मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा  शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंञीमंडळात अनिल पटेल यांच्या रुपाने अर्थ व  नियोजन राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर  बराच काल उलटल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये संदिपान भुमरे यांना रोजगार व फलोत्पादन खात्याचे  कँबिनेटमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर आताच्या सत्तासंघर्षामध्ये शिवसेनेमधील पहिल्या बंडाच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावणारे संदिपान भुमरे यांना पुन्हा कँबिनेट मंत्री मिळण्याचे खाञीलायक वृत्त आहे.

औरंगाबाद पालकमंत्री पदाबाबत उत्सुकता

संदिपान भुमरे औरंगाबादच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असतील. कारण आगामी महापालिका निवडणुकीसाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, भाजप सरकारमध्ये सहभागी असल्याने त्यांचीही या पदासाठी दावेदारी प्रबळ राहणार आहे. तर आधीचेच पालकमंत्री पद भुमरे यांच्याकडे राहण्याची दाट शक्यता आहे. दुसरी बाजू म्हणजे जिल्ह्यातील ४ आमदार एकनाथ शिंदे गटाचे असल्याने भुमरे यांना पालकमंत्री पद दिले जाते, की यवतमाळचे पालकमंत्री दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button