औरंगाबाद: पाऊस लांबल्याने मूग, उडिदाचे उत्पादन घटणार; जिल्ह्यात 45 टक्के क्षेत्रावर पेरण्या | पुढारी

औरंगाबाद: पाऊस लांबल्याने मूग, उडिदाचे उत्पादन घटणार; जिल्ह्यात 45 टक्के क्षेत्रावर पेरण्या

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा: मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर लांबलेल्या मान्सूनच्या पावसामुळे जिल्ह्यात पेरण्यांची गती मंदावली आहे, जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात 45 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पाऊस लांबल्याने यंदा मूग, उडीद पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

यंदा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस काही झाला नाही. जूनच्या सुरवातीला दाखल होणारा मान्सूनही लांबला. काही भागांत समाधानकारक पाऊस पडला, तर काही भागांत पावसाने ओढ दिली. परिणामी पेरण्या खोळंबल्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने वेग घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 6 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 3 लाख 9 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यात तूर, मूग, उडीद या पिकांची 1,36,640 हेक्टरवर पेरणी झाली असून, हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 27 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, मका या पिकांची सर्वाधिक पेरणी झाली आहे.

कापसाचे एकूण क्षेत्र 3,94,268 हेक्टर असून, यापैकी 1,90,250 हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची 14,614 हेक्टर क्षेत्रापैकी 9624 हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या दोन वर्षांत जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने पेरण्याही झाल्या होत्या, मात्र मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता, आपल्याकडे 15 जुलैपर्यंत पेरण्या होतात. त्यामुळे यंदाही 10 ते 15 जुलैपर्यंत पेरण्या होतील, अशी माहिती कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली.

 उसाकडेही ओढा

जिल्ह्यात उसाचे एकूण क्षेत्र 15958 हेक्टर असून, 6864 हेक्टरवर नवीन उसाची लागवड करण्यात आली आहे. यात पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि सिल्‍लोड तालुक्यात एकूण क्षेत्रापैकी 43 टक्के क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

Back to top button