औरंगाबाद : सत्तार यांचे बंड नसून, जनहितार्थ उचललेले पाऊल | पुढारी

औरंगाबाद : सत्तार यांचे बंड नसून, जनहितार्थ उचललेले पाऊल

सिल्लोड , पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतलेली भूमिका हे बंड नसून, जनहितार्थ उचललेले पाऊल असल्याचे मत सिल्लोड येथे रविवारी (दि.26) दुपारी त्यांच्या समर्थकांकडून काढण्यात आलेल्या रॅली व जाहीर सभेतून मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान, या रॅलीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे यांच्याकडून सांगण्यात आले होते, परंतु हवामान प्रतिकूल असल्याने ते येऊ शकले नाहीत, असे जाहीर सभेत सांगण्यात आले.

शहरातील मुख्य रस्त्यावर समर्थक हातात भगव्या झेंड्यांसह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे व अब्दुल सत्तार यांचे छायाचित्र असलेले फलक व गळ्यात भगवे रुमाल बांधून सहभागी झाले होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शिनी चौक अशी रॅली काढण्यात आली. अब्दुल सत्तार व एकनाथ शिंदे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या, रॅलीचे प्रियदर्शिनी चौक येथे सभेत रूपांतर झाले. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सहभागी झालेल्या समर्थकांचे आभार व्यक्त करीत एकनाथ शिंदे यांच्यामुळेच अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, याची आठवण करून दिली.

अब्दुल सत्तार यांचा अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा स्वभावगुण असून, यापूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात अशोक चव्हाण यांच्या समर्थनात, तसेच काँग्रेस पक्षात अशोक चव्हाण यांना वाईट वागणूक मिळत असताना त्यांच्या समर्थनात काँग्रेस पक्षात असताना बंड पुकारले होते. आता शिवसेना पक्षासह मतदारसंघ व मतदारांच्या हितासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड नव्हे, तर न्याय व हक्काचा आवाज उठविला, असे ते म्हणाले. शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, न. प. गटनेते नंदकिशोर सहारे, संचालक मनोज वराडे, नरसिंग चव्हाण, दुर्गाताई पवार आदींनी आपल्या भाषणांतून समर्थन करीत महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या वागण्यावर टीका केली. उपस्थितांचे आभार शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल यांनी मानले.

रॅलीमध्ये गजानन महाजन, अब्दुल आमेर, माजी उपसभापती अजीज बागवान, सत्तार बागवान, मनोज झवर, पप्पू जगनाडे, मच्छिंद्र
पालोदकर, आसिफ बागवान, प्रवीण मिरकर, रऊफ बागवान, समाधान साळवे, शेख मोहसीन, रविसिंग राजपूत, नासेर पठाण यांच्यासह
मोठ्या संख्येने शिवसेनेतील अब्दुल सत्तार समर्थक सहभागी झाले होते. चोख पोलिस बंदोबस्त अनुचित प्रकार घडू नये यासाठी अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विजयकुमार मराठे, पोलिस निरीक्षक अशोक मोदीराज, पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्यासह 50 कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button