औरंगाबाद : पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही सोडला प्राण | पुढारी

औरंगाबाद : पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही सोडला प्राण

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून गुण्यागोंविदाचा संसार सुरू होता. मात्र, अचानक पत्नीचे आकस्मित निधन झाले. पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने पतीनेसुद्धा काही क्षणात प्राण सोडला. ही दुर्देवी घटना पैठण तालुक्यातील ब्रम्हणगाव येथे आज (दि.२६) घडली. जिजाबाई बिसनराव ढाकणे (वय ७४), बिसनराव दगडु ढाकणे  (वय ७८ ) असे मृत वयोवृद्ध दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राम्हणगाव येथील जिजाबाई बिसनराव ढाकणे यांचे आज सकाळी ७:३० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीची  तयारी सुरू असतानाच पत्नीच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने त्यांचे पती बिसनराव दगडु ढाकणे यांनी ही अवघ्या ४ तासाच्या अवधीत प्राण सोडला. त्यामुळे अंत्यविधीला जमलेले नातेवाईक व ग्रामस्थांना मयत पत्नीच्या पाठोपाठ पतीच्या पार्थिवावर देखील अंत्यविधी करण्याची वेळ ओढावली. या घटनेने आडूळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेने ढाकणे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दाम्पत्याच्या पार्थिवावर ब्राम्हणगावातील स्मशानभूमीत आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईकांना शोक अनावर झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. माजी सरपंच भीमराव ढाकणे यांचे ते चुलते होत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button