पैठण : लाच घेणारा वायरमन जाळ्यात | पुढारी

पैठण : लाच घेणारा वायरमन जाळ्यात

पैठण, ढोरकीन पुढारी वृत्तसेवा : ढोरकीन (ता. पैठण) येथील महावितरणच्या वायरमनला गुरुवारी (दि. 23) दुपारी चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. घरापासून विद्युत तारा दुसर्‍या खांबवरती लावण्यासाठी वायरमन किशोर आगळेने ही लाच घेतली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

महावितरण विभागाच्या ढोरकीन येथील वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नेमणूक असलेला किशोर बप्पासाहेब आगळे हा ढोरकीन येथे वायरमन म्हणून काम बघतो. ढोरकीन परिसरातील बालानगर फाट्यावरील तक्रारदाराच्या घराच्या जवळून थ्री फेज विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्यातील एक तार वार्‍याने तुटून तक्रारदाराच्या घरावर पडली होती . त्यामुळे त्या तारा घरापासून सुरक्षित काही अंतरावर असलेल्या वीज खांबावर लावून देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी वायरमनने केली होती . मात्र तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क केला. गुरुवारी दुपारी पंचासमक्ष वायरमन किशोर आगळे यास चार हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई कर्मचारी अशोक नागरगोजे, भूषण देसाई, थेटे यांनी केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button