औरंगाबाद : वैजापूरातील शिवसैनिक आ. रमेश बोरनारेंविरूद्ध एकवटले | पुढारी

औरंगाबाद : वैजापूरातील शिवसैनिक आ. रमेश बोरनारेंविरूद्ध एकवटले

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊन सामील झाल्याने पक्षातील जुन्या व नूतन पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ज्यांची सरपंच व्हायची लायकी नव्हती, ते केवळ शिवसेनेच्या वरिष्ठ व स्थानिक पक्षनेतृत्वाच्या जिवावर आमदार झाले. अशा जहाल शब्दांत बोलून पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहे. घर जळत असताना आम्ही स्वस्थ कसं बसायचं? असा संतप्त सवाल पदाधिकार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्याचे नगरविकासमत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुध्द बंड पुकारले. या बंडात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे हेही सहभागी झाले आहेत. बोरनारेंच्या या कृतीचा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठा धक्‍का बसला असून सर्वच सैरभैर झाले आहे. शिवसेनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. आसाराम रोठे यांनी तीव— शब्दांत प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. ज्यांची ग्रामपंचायतीचा सरपंच अथवा सदस्य होण्याची लायकी नव्हती, ते केवळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. एम. वाणी यांच्या कृपेमुळे विधानसभा सदस्य झाले. बोरनारेंनी केवळ पक्षनेतृत्वाशीच गद्दारी केली नाही तर स्व. आर. एम. वाणी यांच्या विचारांशीही प्रतारणा केली.

पक्षात आम्ही 40 वर्षे घालविलेली असून आर. एम. वाणी यांच्यासोबतच मीही पक्षवाढीसाठी योगदान दिलेले आहेत. तालुक्यात शिवसेना आम्ही रुजवली. वरिष्ठ व स्थानिक पक्षनेतृत्वासोबत कधीच गद्दारी केली नाही. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बोरनारेंच्या अनुयायांचा अपवाद वगळता सर्वच शिवसैनिक त्यांच्याविरुद्ध एकवटले आहे.

गद्दारी सहन न होण्यासारखी

आर. एम. वाणी हे शिवसेनेचा चेहरा होते. शिवसेना म्हणजे आमचे घर आहे. त्यामुळे घर जळत असताना आम्ही स्वस्थ कसे बसणार? असा प्रश्न उपस्थित करून गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील जुन्या पदाधिकार्यांना डावलण्यात येत आहे. या बाबीची खंत नाही. परंतु बोरनारेंनी पक्षाशी केलेली गद्दारी सहन होण्यासारखी नाही. आज स्व. वाणी हयात असते तर बोरनारेंनी ही हिंमत केली नसती अशा शब्दांत अ‍ॅड. रोठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचलंत का? 

Back to top button